Home संगमनेर आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला होताच विखे पाटील यांचा इशारा

आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला होताच विखे पाटील यांचा इशारा

Breaking News | Sangamner: शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर गुरुवारी रात्री एका तरुणानं हल्ला केला.  विखे पाटील यांचा इशारा, “महायुतीचे कार्यकर्ते त्याच भाषेत उत्तर देतील”

MLA Amol Khatal was attacked

अहिल्यानगर- शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर गुरुवारी रात्री एका तरुणानं हल्ला केला. संगमनेर शहरातील मालपाणी लॉन्स येथे राजस्थान युवक मित्र मंडळाच्या वतीनं आयोजित संगमनेर फेस्टिव्हलच्या उद्घाटनावेळी ही घटना घडली. हात मिळवण्याच्या बहाण्यानं झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला. सुरक्षारक्षकांनी तत्काळ धाव घेत हल्लेखोराला ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली केलं.

संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील प्रसाद गुंजाळ या तरुणानं अचानक आमदार खताळ यांच्यावर झडप घालत हल्ला केला. मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्याला तात्काळ पकडत ताब्यात घेतलं. हल्लेखोराला मालपाणी लॉन्स येथील एका ऑफिसमध्ये ठेवण्यात आलं. दरम्यान, मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमा झाल्यानं तणाव निर्माण झाला.

आमदारांकडून शांततेचं आवाहन-शेकडो कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले. त्यावेळी आमदार अमोल खताळ स्वतः घटनास्थळी आले. त्यांनी कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केले. या घटनेचा आका कोण आहे, याचा आपण शोध घेऊ. कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊ नये. पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केलं.

शहरात पोलीस बंदोबस्त वाढवला- आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्याचं समजताच मालपाणी लॉन्सच्या बाहेर खताळ समर्थक मोठ्या संख्येनं जमले. त्यामुळे पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शहरात बंदोबस्त वाढवला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या हल्ल्यामुळे संगमनेरातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महायुतीचे कार्यकर्ते त्याच भाषेत उत्तर देतील- घटनेनंतर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. हा भ्याड हल्ला असल्याचे सांगत त्यांनी दोषींवर तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत. काही लोकांना लोकशाही मान्य नसेल आणि ठोकशाही मान्य असेल तर महायुतीचे कार्यकर्ते त्याच भाषेत उत्तर देतील, असा विखे पाटील यांनी इशारा दिला. भ्याड हल्ला करून महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास कमी होईल, असा काहींचा गैरसमज असेल तर हा गैरसमज दूर करायला वेळ लागणार नाही, असेही विखे पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

पोलिसांनी निष्पक्षपणानं या घटनेची चौकशी करावी- संगमनेर शहरात आमदार अमोल खताळ यांच्याबाबतीत घडलेली घटना अत्यंत चुकीची आहे. या घटनेचा काँग्रेसच्या वतीनं निषेध करत आहोत. पोलिसांनी निष्पक्षपणानं या घटनेची चौकशी करावी. सत्य आणि वस्तुस्थिती स्पष्ट करणारे निवेदन पोलिसांमार्फतच प्रसारित करण्यात यावे, अशी मागणी संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजय फटांगरे आणि संगमनेर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी केली आहे.

Breaking News: Vikhe Patil’s warning as soon as MLA Amol Khatal was attacked

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here