Breaking News: देहूत पालखीला आलेल्या वारकऱ्याचा क्रेनखाली येऊन मृत्यू.
चिखली : देहू-आळंदी रस्त्यावर चिखली येथील शेलारवस्ती परिसरात बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास क्रेनखाली येऊन जखमी झालेल्या वारकऱ्याचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला. नारायण राणबा गोरवे (वय ६२, रा. आहेरगाव, ता. माढा, जिल्हा सोलापूर) असे मृत्यू झालेल्या वारकऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी क्रेनचालकाला ताब्यात घेतले असून, गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नारायण गोरवे पंधरा वर्षांपासून आळंदी ते पंढरपूर पायी वारी करीत होते. संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थानासाठी ते देहूला गेले होते. त्यानंतर देहूकडून आळंदीकडे पायी जाताना चिखली येथे हा अपघात झाला.
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतून प्रस्थान झाल्यानंतर वारकरी नारायण गोरवे देहूहून आळंदीला पायी निघाले होते. चालत असताना चिखली येथे अचानक क्रेनचा धक्का बसून चाकाखाली पडले. त्यांचे दोन्ही हात, पाय निकामी झाले. अपघातस्थळी रुग्णवाहिकेची तत्काळ मदत न मिळाल्याने गोरवे यांना खासगी रिक्षाने रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले. रस्त्यात मध्ये रुग्णवाहिका मिळाल्याने त्यांना तिच्यातून पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात नेण्यात आले; परंतु, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
Breaking News: Warkari dies after being hit by crane