चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या, पतीनेही संपवली जीवनयात्रा..
Breaking News | Sakora Crime: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा दोरीने गळा आवळून खून करून पतीनेही झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना.
साकोरा- चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा दोरीने गळा आवळून खून करून पतीनेही झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. २) सकाळी हातगाव (ता. चाळीसगाव) शिवारात घडली. याप्रकरणी मृत पतीविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला.
हातगाव शिवारात सावरगाव (ता. नांदगाव) येथे विजय सुखदेव चव्हाण पत्नी वर्षा (वय ४०), मुले व आई-वडिलांसमवेत शेतात राहत होता. चव्हाणके यांचे दोन वर्षांपूर्वी झालेल्या अपघातामुळे मानसिक संतुलन बिघडले होते. त्यामुळे पती-पत्नीत नेहमी वाद होत. यातूनच तो पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊ लागला.
सोमवारी (ता. २) सकाळी विजय चव्हाणके यांने आपला मोठा भाऊ अशोक याला फोन करून मी पत्नीला संपवले असून, मीही माझ्या जिवाचे बरे-वाईट करणार असल्याचे सांगितल्याने भाऊ विजय व त्यांच्या पत्नीने शेतात धाव घेतली असता, शेताच्या बांधावरील आंब्याच्या झाडाला विजय गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला, तर त्याची पत्नी वर्षा गुरांच्या चाऱ्यामध्ये मृत अवस्थेत आढळली.
अशोक चव्हाणके यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला. घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी धनंजय येरूळे यांच्यासह पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोलिस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, राहुल राजपूत, हवालदार ओंकार सुतार तसेच फॉरेन्सिक टीम दाखल झाली. या घटनेचा पंचनामे करून फॉरेन्सिक टीमने पुरावे गोळा केले. या घटनेने सावरगाव व हातगाव परिसरात खळबळ उडाली.
Breaking News: Wife murdered over suspicion of character, husband also ends his life