संगमनेर: आजारी पत्नीला बरे करण्यासाठी केला जादूटोणा, पतीसह दोघांविरुद्ध गुन्हा
Breaking News | Sangamner Crime: मृत कोंबडे, बोकडाचे मुंडके, लिंबू, नारळाचे तुकडे, बांगड्या, कोहळाचे तुकडे, हळद-कुंकू जमिनीत गाडले. तसेच झाडावर काळ्या रंगाची बाहुली व लिंबू खिळ्याच्या साहाय्याने बांधून जादूटोणा केला.

संगमनेर : पत्नी नेहमी आजारी पडत असल्याने तिला बरे वाटण्याकरिता मृत कोंबडे, बोकडाचे मुंडके, लिंबू, नारळाचे तुकडे, बांगड्या, कोहळाचे तुकडे, हळद-कुंकू जमिनीत गाडले. तसेच झाडावर काळ्या रंगाची बाहुली व लिंबू खिळ्याच्या साहाय्याने बांधून जादूटोणा केला. ही घटना गुरुवारी (दि.२०) समोर आली असून याप्रकरणी पतीसह दोघांविरुद्ध संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कोंडाजी सावळेराम कराळे (रा. नांदुरी दुमाला, ता. संगमनेर) आणि शैलेश प्रभाकर मेहेत्रे (रा. धांदरफळ बुद्रूक, ता. संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात शेतकरी किसन नामदेव शेटे (रा. नांदुरी दुमाला, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३चे कलम ३ (२) प्रमाणे पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला.
कोंडाजी कराळे यांची पत्नी नेहमी आजारी पडत असल्याने त्यांनी रात्री १ ते सकाळी ८:३० वाजेच्या दरम्यान शेटे यांच्या शेतात व म्हसोबा मंदिरासमोर जादूटोणा केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. घटनास्थळी पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी भेट दिली असून अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विकास काळे करीत आहेत.
Breaking News: Witchcraft used to cure sick wife, crime against husband and two others


















































