अहिल्यानगर जिल्ह्यात आणखी तीन दिवस यलो अलर्ट
Breaking News | Rain Update: 17, 18 व 19 सप्टेंबर या दिवशी विजांच्या गडगडाटांसह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसासह तुरळक ठिकाणी वारा वाहण्याची शक्यता असल्याचा अंदाज.
अहिल्यानगर : गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 24.8 मिलिमीटर पाऊस झाला. श्रीरामपूर तालुक्यात पहिल्यांदाच अतिवृष्टीची नोंद झाली. पारनेर, पाथर्डी, नगर, राहुरी व राहाता तालुक्यांत जोरदार तर राहुरी, नेवासा, कोपरगाव, संगमनेर व शेवगाव तालुक्यांत मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. या पावसाने शेतपिके आणि रस्त्यांचे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामासाठी हा पाऊस फायद्याचा ठरणार आहे. दरम्यान, 19 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात येलो अलर्ट जारी झाला आहे. त्यामुळे जनतेला सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सोमवारी सकाळी 10 ते मंगळवारी सकाळी 10 वाजेपर्यंत श्रीरामपूर तालुक्याला पावसाने झोडपून काढले आहे. या तालुक्यातील चारही महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. सोमवारी दुपारनंतर पाथर्डी, पारनेर तालुक्यात पाऊस सुरुच होता. पाथर्डी तालुक्यातील चार तर पारनेर तालुक्यातील दोन महसूल मंडलांत अतिवृष्टी झाली. राहुरी, राहाता, संगमनेर, कोपरगाव तालुक्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात सुरु असलेल्या पावसामुळे काढणीला आलेल्या बाजरी, सोयाबीन व इतर पिकांचा फटका बसला आहे.
जिल्ह्यात 17 सप्टेंबरला विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसासह तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. 18 व 19 सप्टेंबर या दोन दिवशी विजांच्या गडगडाटांसह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसासह तुरळक ठिकाणी वारा वाहण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. जोरदार पाऊस झाल्यास जिल्ह्यातून वाहणाऱ्या भीमा, गोदावरी, प्रवरा, मुळा, घोड, सीना, कुकडी खैर व हंगा आदी नद्यांच्या पात्रांत धरणांतून सोडलेल्या विसर्गामुळे या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Breaking News: Yellow alert for three more days in Ahilyanagar