तरुणीची इमारतीच्या २३ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या, दोन तुकडे
Breaking News | Suicide: एका तरुणीने इमारतीच्या २३ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या.
मुंबई : विक्रोळी येथे सोमवारी रात्री एका तरुणीने इमारतीच्या २३ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. कन्नमवार नगर येथील इमारत क्रमांक ९७ मध्ये ही घटना घडली. आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव हर्षदा तांदोलकर (२५) असे आहे. या घटनेमुळे विक्रोळी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या तरुणीने आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
माहिती अशी की, कन्नमवार नगर येथे सोमवारी रात्री या तरुणीने इमारतीच्या २३ व्या मजल्यावरून खाली उडी मारली. त्यावेळी झालेल्या आवाजामुळे स्थानिकांनी तेथे धाव घेतली. त्यावेळी तरूणीने इमारतीवरून उडी मारल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. ही मुलगी खाली उभ्या असलेल्या एका दुचाकीवर पडली. त्यामुळे या तरुणीच्या शरीराचे दोन तुकडे झाले आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून या तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेण्यात आला आहे. तरूणीची मानसिक स्थिती ठीक नव्हती. त्याबाबत उपचारही सुरू होते, अशी माहिती कुटुंबियांकडून पोलिसांना देण्यात आली. याशिवाय घटनेचे सीसी टीव्ही चित्रिकरणही उपलब्ध असून त्यामुळे ती आत्महत्या असल्याचे स्पष्ट असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत नाईकवाडी यांनी सांगितले. दरम्यान, या तरुणीने नक्की कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, ते अद्याप कळू शकलेले नाही. विक्रोळी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Breaking News: Young woman commits suicide by jumping from 23rd floor of building