Home अहिल्यानगर अहिल्यानगर: पावसाचे थैमान, नागरिकांना हलविले, अनेक जनावरे व वाहने पुराच्या पाण्यात वाहून...

अहिल्यानगर: पावसाचे थैमान, नागरिकांना हलविले, अनेक जनावरे व वाहने पुराच्या पाण्यात वाहून गेली.

Breaking News | Ahilyanagar Flood:  मुसळधार पावसाने भीषण परिस्थिती निर्माण झाली, मात्र अनेक जनावरे व वाहने पुराच्या पाण्यात वाहून गेली.

Ahilyanagar Flood Heavy rains displaced citizens

पाथर्डी:   तालुक्यात रविवारी रात्री व सोमवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसाने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. नाणी नदी, कोरडगाव, कोळसांगवी, खरमाटवाडी, कारेगाव परिसरातील वस्त्यांमध्ये पाणी शिरले. या ठिकाणी प्रशासन व नागरिकांच्या मदतीने 75 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. पिंपळगाव येथे पुराच्या प्रवाहात वाहून जाणार्‍या एका व्यक्तीचा जीव स्थानिकांनी मोठ्या शर्थीने वाचवला. मात्र अनेक जनावरे व वाहने पुराच्या पाण्यात वाहून गेली.

अमावस्यानिमित्त मढी येथे मुक्कामी आलेले सुमारे 500 भाविक पूरपरिस्थितीत अडकले. गावाचा संपर्क सकाळपर्यंत तुटला होता. दुपारी संपर्क सुरू झाल्यानंतर देवस्थान समितीने या भाविकांना जेवणाची सोय केली. पूरस्थिती गंभीर झाल्याने सोमवारी सकाळी मोहटादेवी गडाकडे जाणारे सर्व मार्ग बंद झाले. घटस्थापनेच्या दिवशी भाविकांनी गडावर न येता घरीच थांबावे, असे आवाहन देवस्थान समितीकडून करण्यात आले. कारेगावचा पूल पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरकडून येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. नंतर पाण्याचा पूर ओसरल्यानंतर दुपारी चार वाजता मुरुम टाकून तात्पुरत्या स्वरूपात हा मार्ग सुरू करण्यात आला. पर्यायी मार्ग म्हणून धायतडकवाडी-डोंगरशिवारातून दीपाली हॉटेलपासून कल्याण-विशाखापट्टणम मार्गाचा वापर नागरिकांनी केला.

राष्ट्रीय महामार्ग (कल्याण-विशाखापट्टणम) : येळी-फुंदे टाकळी दरम्यानचा पूल खचल्याने अनेक ठिकाणी भगदाड पडले होते. वाहतूक धोकादायक झाली; महामार्ग प्राधिकरणाने चेतावणी फलके लावली आहे. राज्य महामार्ग (बारामती-छत्रपती संभाजीनगर, पाथर्डी-बीड, बीड-मोहटा) सर्व पुलांवरून पाणी वाहिल्याने पूर्णपणे बंद झाले होते. सुसरे-सोमठाणा रोडवरील पूल तुटला, कोरडगाव-बोधेगाव पूल वाहून गेला त्यामुळे येथील वाहतूक बंद आहे. मोहरी-मोहटागड दरम्यानचा पूल वाहून केल्याने येथील परिसरातील देवी भक्तांना मोठी अडचण झाली आहे.

गर्भगिरी डोंगर पट्ट्यातील पाण्याने माणिकदौंडी, वृद्धेश्वर, घाटशिरस, मढी, मोहटा, करोडी, चिंचपूर, अकोला, पालवेवाडी, धायतकवाडी, मोहोज देवढे, जांभळी, खर्डे, तिनखडी, भिलवडे, दुले चांदगाव, भालगाव, मोहरी आदी परिसरात धुमाकूळ घातला. विशेषता तालुक्यातील पूर्व भागातील सर्वच गावांना पुराचा मोठा तडाखा बसला आहे. या पुराच्या पाण्यात पूर्व भागातील एकही गाव वाचले नाही. सर्वांनाच कमी अधिक प्रमाणात याचा फटका बसला आहे.तिनखडी येथील गाढव तलाव फुटल्याने पाणीच पाणी झाले.धायतडकवाडी येथील पाझर तलाव धोकादायक स्थितीत असून खालच्या वस्त्या जलमय होऊन शेतात पाणी गेले.

जोगेवाडी, चिंचपूर पांगुळ, मानेवाडी, वडगाव, पिंपळगाव टप्पा या भागातही चांगला पाऊस झाल्याने जनजीवन करीत होऊन सर्व ठप्प झाले होते. पावसाचा या आणीबाणीत काही कंपन्यांची दूरसांचार सेवा बंद पडली होती. पाथर्डी शहरात मुंडे कॉम्प्लेक्स, सर्वच उपनगरात पाणी साचले गेले. गाडगे आमराई, रंगार गल्ली याठिकाणी पाणी शिरले. अनेक घरांच्या भिंती पडल्या. नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने गाडगे आमराई परिसरातून दोन नागरिकांना पुरातून बाहेर काढले. भगवान दराडे यांच्या जय मातादी कन्स्ट्रक्शनच्यावतीने कारेगावसह अनेक रस्ते मोकळे केले. तसेच प्रशासनाच्या मदतीने कारेगावचा पुलावरील ही रस्ता सुरळीत केला.

शेतीतील उभी पिके, जनावरे, घरे, दुकाने, पूल, बंधारे, रस्ते या सर्वांवर मुसळधार पावसाने मोठे नुकसान केले. कोरडगाव सह अनेक ठिकाणच्या नागरिकांनी घरांच्या छतांवर, उंच ठिकाणी आश्रय घेतला. अनेकांनी स्थलांतर केले. नदीकाठच्या वस्त्यांतील नागरिक रात्रभर जागरण करत राहिले. प्रांत अधिकारी प्रसाद मते, तहसीलदार उद्धव नाईक, जलसंधारणचे उपविभागीय अधिकारी प्रवीण दहातोंडे, पोलीस निरीक्षक विलास पुजारी , पाथर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे हे बचाव कार्यासाठी आपल्या बचाओ पथकाच्या मदतीने मदत करीत होते. पोलीस दलाची रात्रीपासूनच मोठी धावपळ झाली. ठिकाणी मदत कार्य करण्यासाठी पोलीस पथक दाखल होत होते.

अनेक ठिकाणचे रस्ते बंद पडले होते ते सुरळीत करण्याचे काम पोलीस दलाने विविध शासकीय विभागांच्या प्रतिनिधींच्या मदतीने केले. मोहटा देवीकडे जाण्यासाठी सर्वच रस्त्यावर पाणी असल्याने भाविकांचे मोठे हाल झाले. घटस्थापनेच्या दिवशी विशेषतः पायी येणार्‍या देवी भक्तांचे संख्या लक्षणीय असते अशा भाविकांचेही मोठे हाल झाले.जिल्हा प्रशासनाने अद्यावत असलेल्या सर्व गोष्टींनी परिपूर्ण असलेली राज्य आपत्ती बचाव निवारण पथक हे मोहटा देवी गडावर नियुक्त केले आहे हे 6 ऑक्टोबर पर्यंत येथे असणार आहे.

शेवगाव तालुक्यातील डोंगरपट्ट्यात रविवारी रात्रभर ढगफुटीसदृश पाऊस झाल्यामुळे सर्वत्र नदी-नाल्यांचे पाणी भरून तालुक्यातील ढोरा, नंदिनी, काशीसह छोट्या-मोठ्या नदींना महापूर आल्याने तालुक्यात सर्वत्र वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक गावांना फटका बसून जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने सतर्क राहून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

जामखेड: तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचे थैमान घातले असून रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. साकत, जातेगाव, दिघोळमध्ये ढगफुटी झाली. दिघोळमध्ये अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. विधाते वस्ती येथे मंदिराला पाणी लागले आहे. त्याचबरोबर मांजरा नदीला पुर आला आहे. तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. विशेषतः नदीकाठच्या लोकांना मोठा फटका बसला आहे. पिके पाण्यात गेली आहेत, त्यामुळे तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे. शहरातील नागेश्वर मंदिरात जाण्यासाठी धाकटी नदीवरील असलेला लोखंडी पुल पावसामुळे खचला आहे. उदघाटनाआधीच पुल खचल्यामुळे कामाच्या दर्जाबाबत शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.

Breaking News: Ahilyanagar Flood Heavy rains displaced citizens

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here