‘समृद्धी’वर पुन्हा भीषण अपघात; कार मधील तिघे जागीच ठार
Breaking News | Samruddhi Mahamarg Accident: सलग दुसऱ्या दिवशी भीषण अपघात, कार धडकून तिघांचा जागीच मृत्यू.
दौलताबाद : समृद्धी महामार्गावर अब्दीमंडी ते माळीवाड्यादरम्यान फोर्ड फिगो कार अज्ञात वाहनाला धडकली. यात कारमधील तीन प्रवासी जागीच ठार झाले. ही घटना शनिवारी (ता. १०) रात्री अकराच्या सुमारास घडली.
राहुल आनंद निकम (वय ४७, रा. सावंगी सारा परिवर्तन, हर्सूल), शिवाजी वामनराव थोरात (वय ५८, रा. द्वारकानगर, हडको एन-११) आणि अण्णा रामराव मालोदे (वय ७१, रा. नवजीवन कॉलनी, हडको एन-११) अशी मृतांची नावे आहेत, अशी माहिती घाटी रुग्णालयाचे आरएमओ डॉ. मुद्दसर अन्सारी यांनी दिली.
मृतांपैकी निकम यांचे नाशिक जिल्ह्यात गाव आहे. नाशिक येथील कार्यक्रमाला हे तिघे छत्रपती संभाजीनगरहून समृद्धी महामार्गावरून कारने (एमएच २० ईई ०७४५) जात होते. निकम स्वतः कार चालवत होते. शहराबाहेर पडताच काही मिनिटांत रात्री अकराच्या सुमारास अब्दीमंडी ते माळीवाडादरम्यान चॅनल क्रमांक ४३८ च्या जवळ त्यांची कार समोर असलेल्या अज्ञात जडवाहनाला मागून धडकली. कार वेगात असल्याने तिचा चेंदामेंदा झाला.
दरम्यान, कारच्या दोन्ही एअरबॅग उघडून फाटल्या. त्यामुळे कारमधील तिघांचाही जागीच मृत्यू झाला. महामार्ग पोलिस विभागाचे विनोद भालेराव आणि दौलताबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
Web Title: accident on ‘Smriddhi Three people in the car died on the spot
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study