रीलसाठी साडी आणायला गेली अन्…; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीचा करुण अंत
Breaking News | Kolapur Accident: सिमेंट मिक्सर ट्रकच्या धडकेमुळे एका विद्यार्थिनीचा मृत्यू.
कोल्हापूर: सिमेंट मिक्सर ट्रकच्या धडकेमुळे एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कोल्हापुरात घडली आहे. इन्स्टाग्रामवरील रीलसाठी आपल्या मित्रासोबत साडी आणण्यासाठी गेली असताना झालेला अपघात या विद्यार्थिनीच्या जीवावर बेतला. कोल्हापुरात राहून इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात ही विद्यार्थिनी शिक्षण घेत होती. मात्र तिचा असा अपघाती मृत्यू झाल्याने कोल्हापूर शहर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, 19 वर्षीय श्रेया महेश देवळे ही विद्यार्थिनी मूळची साताऱ्याच्या कराड तालुक्यातील उंब्रज गावची असून सध्या कोल्हापुरातील कळंबा रिंगरोड येथील साळोखेनगर परिसरात शिक्षणासाठी राहात होती. श्रेया आणि तिचा वर्गमित्र ओम संदीप पाटील दोघेही कोल्हापुरात शिक्षण घेत होते. बुधवारी दुपारी श्रेयाने ओमला सांगितले की, तिला इन्स्टाग्रामवरील रील बनवण्यासाठी साडी हवी आहे. त्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास ओम आणि श्रेया दुचाकीवरुन गंगावेश येथील मामाच्या घरी साडी आणण्यासाठी गेले होते. साडी घेतल्यानंतर ते दोघे पंचगंगा नदीमार्गे शहरातील सोन्या मारुती चौकात परतत होते. त्यावेळी त्यांचा अपघात झाला होता.
रात्री साडेदहाच्या सुमारास सिमेंट मिक्सर रेडमिक्स काँक्रीट ट्रकने ओमच्या दुचाकीला ओव्हरटेक करताना ट्रकचालकाने अचानक डावीकडे वळण घेतले. त्यावेळी ट्रकच्या मागील डाव्या बाजूच्या चाकाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे दुचाकी जमिनीवर कोसळली आणि दोघेही रस्त्यावर फेकले गेले. अपघातानंतर आसपासच्या नागरिकांनी तातडीने दोघांना उचलून जखमी अवस्थेतच उपचारासाठी सीपीआर रूग्णालयात दाखल केले. परंतु या अपघातात श्रेया गंभीर जखमी झाली होती. त्यामुळे उपचारादरम्यान श्रेयाचा मृत्यू झाला. तर ओम पाटील देखील जखमी झाला असून त्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. लक्ष्मीपुरी पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Breaking News: Accident student died after being hit by a cement mixer truck