अहिल्यानगर: ग्रामसेवक आत्महत्या प्रकरणी दोन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल
Breaking News | Bachkar Suicide Case: ग्रामसेवक आत्महत्या प्रकरणी कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल.
करजगाव: नेवासा तालुक्यातील करजगाव येथील ग्रामसेवक बाजीराव रखमाजी बाचकर यांच्या आत्महत्या प्रकरणी कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी आणि विस्तार अधिकारी बबन वाघमोडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
बाजीराव बाचकर यांनी ८ ऑगस्ट रोजी विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपवले होते. त्यांच्या आत्महत्येमागे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सातत्याने होणारा मानसिक आणि आर्थिक छळ कारणीभूत असल्याचा आरोप बाचकर यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी न्याय मिळावा यासाठी बाचकर कुटुंबीय, नातेवाईक, धनगर समाजाचे नेते आणि करजगाव ग्रामस्थांनी सोनई पोलिस ठाण्यासमोर आंदोलन केले.
सुमारे नऊ दिवसांच्या आंदोलनानंतर अखेर पोलिसांनी रात्री उशिरा संदीप दळवी आणि बबन वाघमोडे यांच्याविरुद्ध आर्थिक आणि मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. सोनई पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय माळी यांच्याकडे या प्रकरणाचा पुढील तपास आहे. ग्रामसेवकाच्या आत्महत्येमागील नेमके कारण आणि दोषींवर कठोर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Breaking News: Cases filed against two officials in Gram Sevak suicide case