अकोलेतील शेतकऱ्याची साडे सात लाखांची फसवणूक
अकोले: एकीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना दुसरीकडे जीवापाड जपून वाढविलेल्या शेतमालाची किंमत न देता व्यापारी वर्गाकडून लाखो रुपयांना गंडा घालण्याचा प्रकार समोर आला आहे. नवी मुंबई एपीएमसी मार्केटमधील भाजीपाला व्यापाऱ्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील शेतकऱ्याची लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्याकडून करण्यात आला आहे. मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यात अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात राहणाऱ्या २५ शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला विक्रीसाठी नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये पाठवला होता. आपल्या शेतात तळहातावर पिकविलेला कोबी विकण्यासाठी या शेतकऱ्यांनी व्यापारी वर्गाच्या हवेली डोळे झाकून दिला होता.
मालाला चार पैसे आल्यांनंतर घेतलेले कर्ज व पोराबाळांचा शिक्षणाचा खर्च भागविता येईल अशी भाबडी आशा या बळीराजाने मनाशी केली होती. मालाचे लाखो रुपये देण्याऐवजी भाजीपाला मार्केटमधील काही व्यापाऱ्यांनी त्यांना चालढकल केली. शेतकर्याचे एकूण १३ लाख ५० हजार रुपयांची देणी देण्यास टाळाटाळ करून दिलेला १२ लाख रुपयांचा चेकही वटला नव्हता. यानंतर ६ लाख रोख देत ७.५ लाख रुपयांची देणी थकीत ठेवली होती. अखेर सात महिने गेल्यानंतरही आपल्या मालाचे पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी एपीएमसी मार्केट प्रशासनाचे कार्यालय गाठले. पण त्या ठिकाणीही त्यांना योग्य न्याय मिळत नसल्याने अखेर मुख्यमंत्री कार्यालयाकडे व्यापार्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे.
Website Title: Latest News Akole Farmers Fraud