अहिल्यानगर: दुचाकींची समोरासमोर धडक, दोघे जागीच ठार
Breaking News | Ahilyanagar Accident:दोघांच्या मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली., दोघांचा मृत्यू.
बोधेगाव : शेवगाव-गेवराई राज्यमार्गावरील बालमटाकळी गावानजीक दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोन जण ठार झाले मृतांमध्ये शेवगाव तालुक्यातील गायकवाड जळगाव येथील एक माजी ग्रामपंचायत सदस्य व कुंभेजळगाव (ता गेवराई, जि.बीड) येथील एका तरुणाचा समावेश आहे. सदरील घटना सोमवारी (दि.०२) दुपारी तीनच्या सुमारास घडली.
गायकवाड जळगाव येथील नितीन नामदेव केसभट (वय ४४) हे दुचाकीने गावाहून बोधेगावकडे जात होते तर संजय वसंत चव्हाण (२४) हा तरुण बोधेगावहून लग्नसमारंभ उरकून गावी कुंभेजळगावच्या दिशेने दुचाकीवरून निघाला होता. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास बालमटाकळी गावानजीक दोघांच्या मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली.
यामध्ये दोन्ही मोटारसायकल चालक गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच बोधेगाव पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातातील जखमींना तातडीने १०८ रुग्णवाहिकेतून उपचारासाठी हलविले. परंतु, शेवगाव ग्रामीण रुग्णालयात पोहोचताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमींना तपासून मृत घोषित केले. मृत नितीन केसभट यांच्या पश्चात आई-वडील, एक मुलगा-मुलगी, दोन भाऊ, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे.
Breaking News: Two bikes collide head-on, two killed on the spot