मृत समजलेला मुलगा तीन महिन्यांनंतर सापडला जिवंत
Breaking News | Washim: कारंजा पोलिसांची अशीही माणुसकी : हृदयस्पर्शी घटनेने उपस्थितांचे डोळे पाणावले.
वाशिम : आमचा मुलगा गेला… या विश्वासाने तुटलेल्या बिहारमधील एका कुटुंबासाठी आशेचा किरण वाशिम जिल्ह्यात उजाडला. तीन महिन्यांपासून बेपत्ता असलेला जयपाल हा मानोरा वनपरीक्षेत्रात जिवंत अवस्थेत सलीम अन्सारी या व्यक्तीला आढळल्याने, त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा आशेचा किरण उजाडला. पोलिसांनी त्यांच्या घरच्यांचा अथक प्रयत्नातून शोध घेत, थेट व्हिडिओ कॉल करून संपर्क साधला असता, आपला मुलगा जिवंत पाहून कुटुंबीयांनी हंबरडाच फोडला.
मानोरा वनपरीक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना गस्तीच्या दरम्यान जंगलात एक तरुण भटकंती करताना आढळला. संशय आल्याने त्यांनी त्याच्याशी संवाद साधला असता, त्याने आपले नाव जयपाल असल्याचे सांगितले.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला पोलिस स्टेशन कारंजा शहर येथे आणले असता, कर्तव्यावर हजर असलेले पोलिस शिपाई विजय गंगावणे यांनी त्याची मानसिक स्थिती समजून घेऊन त्याच्या गावाचे नाव शोधले.
फक्त गावाच्या नावावरून गुगल मॅपच्या साहाय्याने तेथील पान शॉप या बोर्डवरील मोबाइल क्रमांकावर कॉल करून बस्ती समारा गावातील व्यक्तीचा मोबाइल क्रमांक मिळविला. अखेर बिहार राज्यातील बजरंग चौक, जिल्हा बत्तीसअमरा येथील त्याच्या कुटुंबाशी संपर्क साधण्यात आला.
जयपाल लवकरच घरी पोहोचेल
जयपाल या तरुणाला कारंजा येथील स्थानिक नागरिक सलमान मेमन यांनी पोलिस निरीक्षक शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी विजय गंगावणे याच्या सहकार्याने आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून सुरक्षितपणे बिहारला रवाना केले. या हृदयस्पर्शी घटनेमुळे मानोरा परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले असून, पोलिस विभाग आणि स्थानिक नागरिक याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Breaking News: Boy presumed dead found alive three months later