आर्मीतील निवृत्त सैनिकाने बंदुकीतून केला अंधाधुंद गोळीबार
अहमदनगर|Crime News: आर्मी मधून निवृत्त असलेल्या सैनिकाने त्याच्याकडील परवानाधारक बंदुकीतून अंधाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्री अकरा ते साडेअकरा वाजेच्या सुमारास जामखेड रोड वरील करांडे मळ्यात ही घटना घडली. संदीप रमेश बांदल (वय ४२ रा. करांडे मळा, जामखेड रोड, भिंगार) असे निवृत्त सैनिकाचे नाव आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या निवृत्त सैनिकास ताब्यात घेतले.
सोमवारी रात्रीच्या सुमारास बांदलने भिंगार येथील सोलापूर टोल नाक्यावर हुज्जत घालण्याचा प्रकार केला. जाणार-येणाऱ्या वाहनांना त्याने टोल न भरण्यास सांगितले. गस्ती पथकावरील पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्या घरी सोडले. यानंतर त्याने त्याच्याकडील परवानाधारक बंदूक लोड करून घराच्या परिसरात अंधाधुंध गोळीबार केला.
गोळीबार केल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बांदल यास अटक केली आहे. यावेळी त्याने पोलीस कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालत मोठ मोठ्याने आरडाओरडा केला. पोलिसांनी त्याच्याकडील परवानाधारक बंदूक जप्त केली आहे.
पोलीस हवालदार जालिंदर नामदेव आव्हाड यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी निवृत्त सैनिक संदीप बांदल विरोधात भादंवि १८६, ५०४, ५०६ सह भारतीय हत्यार अधिनियम, मुंबई पोलीस अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक बेंडकोळी करत आहेत. आरोपी बांदला पोलिसांनी अटक केली असून त्याला दुपारी न्यायालयात हजर करणार आहेत.
Web Title: Crime News Retired soldier fired indiscriminately from a gun