दूरदृष्टीचे व राष्ट्रहित चिंतणारे महामानव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
“दूरदृष्टीचे व राष्ट्रहित चिंतणारे महामानव- डॉ. बाबासाहेब आंबेडकर”
जगात महामानवाला महामानवाच्या रुपातच जन्म घ्यावा लागतो. म्हणूनच पुढे तो आपल्या गुणसंपन्न व्यक्तीमत्वाने आणि महान कर्तुत्वाने महामानव सिध्द होतो. जगाच्या अशा नियमानुसार दि.१४ एप्रिल १८९१ ला मध्यप्रदेशात महु येथे पिता रामजी व माता भिमाई यांच्या पोटी चौदावे अपत्य म्हणून महामानवाच्याच रुपात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. महामानव भिमराव रामजी आंबेडकर यांचे जीवन, व्यक्तित्व आणि कर्तुत्व भारत राष्ट्राच्या, अखिल जगाच्या आणि विश्वात्मक मानवतेच्या कल्याणकारी इतिहासात सोनेरी अक्षरांनी लिहिले जावे अशाच महान योग्यतेचे आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ’बहिष्कृत भारत’ या पाक्षिकाच्या १८ जानेवारी १९२९ च्या अंकात ’नेहरु कमिटीची योजना व हिंदुस्थानचे भवितव्य’ अशा शिर्षकाचा महत्वपूर्ण अग्रलेख लिहीला होता. त्यावेळेला भारतावर इंग्रजांची सत्ता होती, असा पराधिन हिंदूस्थान कधी स्वतंत्र होईल, या बाबतीत अनुमान करणे देखील शक्य नव्हते. परंतू जेव्हा कधी स्वतंत्र होईल, त्यावेळी स्वतंत्र हिदूस्थानच्या आंतरराष्ट्रीय सिमा सुरक्षित असल्या पाहीजेत, आणि हिंदूस्थानचे स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजेत, अशा प्रकारचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे “दूरदॄष्टीचे राष्ट्रप्रेम” व्यक्त करणारा तो अग्रलेख होता. त्या अग्रलेखात नेहरू कमिटीच्या योजनेची जी छाननी केली होती. ती सद्य परिस्थितीतील हिंदूस्थानला आणि भविष्यकाळातील स्वतंत्र हिंदूस्थानला किती धोकादायक आहे , हे समजावून सांगणारी होती. नेहरू कमिटीची योजना हिंदूस्थानातील अस्पृश्यांना आणि मागासलेल्या हिंदूंना राजकीय हक्कांच्या सवलती देणेविषयी कसलाही विचार करणारी नव्हती. ती फक्त हिदूस्थानातील मुस्लिमांना किती आणि कशा राजकीय हक्कांच्या सवलती देण्याबाबत विचार करणारी होती. इ.स. १९१७ ला कॉग्रेस पक्ष आणि मुस्लिम लीग यांचा जो लखनौ करार झाला होता त्याच्या आधारे नेहरु कमिटी योजना मुस्लिमांना जास्तीत जास्त राजकीय हक्कांच्या सवलती देऊ करत होती. राखीव मतदार संघ त्यांना मान्य नव्हता, ते स्वतंत्र मतदार संघाचीच सवलत मागत होते, आणि त्यांची ती मागणी नेहरू कमिटी योजनेने आणि कॉग्रेस पक्षाने मान्य केली होती.
नेहरू कमिटी योजनेने भाषावार प्रांत रचनेचे तत्व स्विकारून सिंध, बलुचिस्तान व वायव्य सरहद्द प्रांत हे वेगळे व स्वतंत्र प्रांत करण्यात यावेत ,असे सुचविले होते. असे केल्याने हिदूस्थानच्या एकूण ९-१० प्रांतापैकी बंगाल, पंजाब, सिंध, बलुचिस्तान आणि वायव्य सरहद्द प्रांत हे पाच प्रांत मुसलमान बहुसंख्यांक होतील आणि बाकीचे प्रांत हिंदू बहुसंख्यांक होते. त्यामुळे मुसलमान बहुसंख्यांक प्रांतात अल्पसंख्यांक हिंदूंवर अत्याचार होणार नाहीत आणि ते सुरक्षित राहतील, त्याचप्रमाणे हिंदू बहुसंख्यांक प्रांतात मुसलमानांवर अत्याचार होणार नाहीत आणि तेही सुरक्षित राहतील अशा प्रकारची भाषावार प्रांत रचना सध्याच्या पराधीन हिंदूस्थानच्या दृष्टीने आणि उदयाच्या स्वतंत्र हिंदूस्थानच्याही दृष्टीनेही धोकादायकच आहे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाटले कारण हिंदूस्थानात हिंदू आणि मुसलमान हे दोनच समाज राहत आहेत, असे नसून दोन भिन्न संस्कृतीची राष्ट्रे नांदत आहेत असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मत होते.
हिंदूस्थान देशाच्या एका बाजूला चीन आणि दुस-या बाजूला जपान ही भिन्न संस्कृतीची राष्ट्रे आहेत तर दुस-या बाजूला टर्की, पर्शिया आणि अफगाणिस्तान ही तीन मुसलमान राष्ट्रे आहेत, अशा कोंडीत हिंदूस्थान देश सापडला आहे असे,डॉ. आंबेडकरांचे मत होते. दोन्हीपैकी कोणत्याही बाजूने हल्ला झाला तर हिंदूस्थानच्या रक्षणासाठी हिंदू व मुसलमान यांनी एकजूटीने प्रतिकार केला तरच हिदंस्थानचे रक्षण करण्यात यश मिळू शकते, चीन किंवा जपानने हल्ला केला तर हिंदू व मुसलमान एकजूटीने हिंदूस्थानचेच रक्षण करू शकतील, पण टर्की, पर्शिया किंवा अफगाणिस्तानने आताच्या हिंदूस्थानवर किंवा स्वतंत्र झालेल्या हिंदूस्थावर हल्ला केला तर हिंदूस्थानच्या रक्षणासाठी हिंदू व मुसलमान एकजूट होतीलच, असे निश्चित सांगता येत नाही. त्यावेळी हिंदूस्थानातील मुसलमानांचा ओढा हल्लेखोर मुसलमान राष्ट्राकडेच असण्याची शक्यता आहे, ही वस्तूस्थिती सध्याच्या हिंदूस्थानसाठी आणि उदया स्वतंत्र होणा-या हिंदूस्थानसाठीही धोक्याची आहे. त्या दिशेलाच वायव्य सरहद्द प्रांत, बलुचिस्तान, सिंध व पंजाब हे मुस्लिम बहुसंख्यांक प्रांत असतील, त्यामुळे हल्लेखोर मुसलमान राष्ट्र सहज मध्य हिंदूस्थान पर्यंत धडक मारून येवू शकते, असे होवू नये म्हणून नेहरू कमिटीची योजना नाकारणे गरजेचे आहे असे, डॉ. आंबेडकरांना वाटले.
आपल्या देशाच्या अकल्याणामध्ये बहुजनांचे, अस्पृश्यांचे पर्यायाने रयतेचे सुद्धा अकल्याण आहे , अशा जाणिवेने डॉ. आंबेडकरांनी कॉग्रेसला सावधगिरीचा इशारा देत कुठल्याही जाती- धर्मासाठी काम न करता, फक्त या अखंड भारत देशासाठीच काम केलं कारण, ते नेहमी म्हणायचे मी प्रथमत: भारतीय आहे आणि अंतिमत: पण भारतीयच आहे म्हणून खरोखरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दूरदृष्टीचे राष्ट्रप्रेमी होते, राष्ट्र्निष्ट होते. म्हणून अशा महामानवाला त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने कोटी-कोटी प्रणाम …!
शब्दांकन …
युवाव्याख्याते-प्रबोधनकार
मा. शिवश्री. सतिष उखर्डे-टेंभूर्णीकर
Website Title: a great man of foresight and national concern Dr. Babasaheb Ambedkar