भरदिवसा घरफोडी, एक लाख ४० हजारांचा ऐवज लंपास
Jamkhed Theft: अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलुप कशाच्या तरी सहाय्याने तोडुन घरात प्रवेश करून लुटले.
जामखेड: ग्रामीण भागात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून तालुक्यातील रत्नापूर या ठिकाणी घरातील लोक घराला कुलूप लावून शेतात गेले असता अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करुन १ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ग्रामीण भागात वेळोवेळी भरदिवसा घरफोड्या होत असल्याने या चोरटयांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी मिना बाळासाहेब वारे या सकाळी शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. त्यांचा एक मुलगा जामखेडला तर दुसरा मुलगा घराला कुलूप लावून शेतात गेला होता. याच संधीचा फायदा अज्ञात चोरट्यांनी घेत मंगळवार दि. १९ रोजी दुपारी १ ते ४ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलुप कशाच्या तरी सहाय्याने तोडुन घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले रोख ८० हजार रुपये व काही सोने असा एकुण १ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी वारे यांचा शेतात गेलेला मुलगा घरी आला असता त्याला घराचे दार उघडे दिसले. त्याने घरात जाऊन पाहिले असता चोरी झाल्याचे लक्षात आले.
दरम्यान, गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून जामखेड तालुक्यात भरदिवसा घरफोड्याचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वीच साकत येथील कडभनवाडी येथेही साकेश्वर महाराजांचा मुकुट चोरीला गेला होता. ही घटना ताजी असतानाच पुन्हा रत्नापूर या ठिकाणी घरफोडी झाली असल्याने लवकरात लवकर या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Web Title: House burglary in broad daylight, 1 lakh 40 thousand theft