अहिल्यानगर: पती-पत्नीचा घरातच मृत्यू झाल्याने खळबळ
Breaking News | Rahata: पती-पत्नीचा घरातच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली.
लोणी: राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील लोमेश्वरनगर मधील पती-पत्नीचा घरातच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. अन्नातून विषबाधा की आणखी दुसर्या कारणाने मृत्यू झाला हे मात्र अस्पष्ट आहे. लोणी खुर्द गावातील लोमेश्वरनगरमध्ये राहणारे तुकाराम उर्फ मोहन कोंडीबा बोरसे व त्यांच्या पत्नी अलका हे शनिवारी सकाळी मृत अवस्थेत राहत्या घरात आढळून आले. याबाबत त्यांचे पुतणे भागवत तुकाराम बोरसे यांनी लोणी पोलिसात खबर दिली. त्यात म्हटले आहे की, याच परिसरात राहणारा सोमा बर्डे सकाळीच माझ्याकडे आला व मला म्हणाला की, तुझा चुलता आणि चुलती घरातच मयत झाले आहेत.
मी लगेच त्यांच्या घरी गेलो असता ते मयत झाल्याचे दिसून आले. त्यांना तातडीने लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी ते मृत असल्याने त्यांचे शवविच्छेदन केले. दरम्यान मृत्यूचे कारण स्पष्ट न झाल्याने त्याचा अहवाल राखून ठेवण्यात आला. दरम्यान लोणी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अन्नाचे व पाण्याचे नमुने घेतले. त्यांची तपासणी केल्यानंतर तुकाराम व अलका यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. तुकाराम हा खासगी वाहनावर काही दिवस चालक म्हणून काम करीत होता.नंतर तो खासगी व्यवसाय करीत होता. त्याची एक मुलगी विवाहित असून ती वैजापूर येथे वास्तव्यास आहे.
ती चार दिवसांपूर्वी तिच्या मुलीसोबत लोणी येथे आई-वडिलांना भेटण्यासाठी आली होती. त्या दोघींनाही जुलाब व उलट्यांचा त्रास होत होता. त्यांना लोणी येथे उपचार केल्यानंतर त्यांच्या विनंतीवरून वैजापूर येथे पाठवण्यात आले. मयत तुकाराम व अलका यांची एक मुलगी लहान असून ती त्यांच्यासोबत रहात होती. तिला मात्र कोणताही त्रास होत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तुकाराम व अलका यांच्या मृत्यूमुळे लोणी परिसरात एकच खळबळ उडाली. त्यांच्या मृत्यूबद्दल अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. पुढच्या काही दिवसात वैद्यकीय अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. लोणी पोलिसांनी भागवत बोरसे यांच्या खबरीवरून आकस्मात मृत्यू रजि. नंबर 93/2024 भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम 194 नुसार गुन्हा दाखल केला.
Web Title: husband and wife died in the house
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study