Home अहिल्यानगर दिवसा घरफोड्या होत असल्याने तालुका हैराण, ग्रामस्थांनी लढवली शक्कल  

दिवसा घरफोड्या होत असल्याने तालुका हैराण, ग्रामस्थांनी लढवली शक्कल  

Jamkhed Crime Taluka harassment due to burglary during the day

Ahmednagar Jamkhed Crime News | जामखेड: शेतावर कामावर गेल्यावर चोरटे गैरफायदा उठवत जामखेड तालुक्यात दिवसा घरफोड्या होण्याच्या घटना वाढल्या आहेत. गावातील शुकशुकाटाचा गैरफायदा उठवत एकाच दिवशी अनेक घरे फोडण्याचे प्रकार सुरू आहेत. पोलिसांनी प्रयत्न करूनही त्यांच्या हाती येत नव्हते. अखेर शनिवारी तालुक्यातील वाघा गावात ग्रामस्थांनी हुशारीने या चोरट्यांना पकडलं आहे. विशेष म्हणजे हेच चोरटे आधी एका गावात चोऱ्या करून वाघा गावात आले होते. तेथे चोरीचा प्रकार लक्षात येताच ग्रामस्थांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा प्रभावी वापर केला. काही वेळात गावातील आणि शेतावर गेलेले ग्रामस्थही एकत्र जमले आणि तिघा चोरट्यांना गावातच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

जामखेड तालुक्यातील आपटी, पिंपळगाव आवळा, वाघा या परिसरात भरदिवसा घरफोड्यांचे गुन्हे वाढले आहेत. यामुळे ग्रामस्थ आणि पोलीसही हैराण झाले आहेत. शेतीची कामे सुरू असल्याने शेतावर जाणे क्रमप्राप्त आहे. याचा गैरफायदा चोरटे उठवत आहेत. शनिवारी असाच प्रकार झाले. पिंपळगाव आवळा येथील गणेश मधुकर ढगे सकाळीच घराला कुलूप लावून शेतावर गेले होते. दुपारी त्यांचे वडील घरी आले. त्यावेळी चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. २५ हजार रुपये रोख व ९० हजारांचे दागिने चोरी गेले होते. त्यांनी अधिक चौकशी केली असता त्याच गावात आणखी काही ठिकाणी चोरी झाल्याचे त्यांना समजले. ही माहिती पोलिसांना कळवण्यात आली. तोपर्यंत शेजारील वाघा गावात असाच प्रकार घडला. सुमंत मारुती जगदाळे यांच्या घरी चोरी झाली. तेही शेतावर गेले असता चोरट्यांनी २२ हजार रुपये रोख व ४२ हजारांचे दागिने चोरून नेले.

जगदाळे यांनी ही माहिती उपसरपंच शिवाजी बारस्कर यांना दिली. त्यांनी तातडीने ग्रामसुरक्षा यंत्रणेवरून सर्व ग्रामस्थांशी संपर्क साधून चोरीची माहिती दिली. त्यामुळे सर्व ग्रामस्थ एकत्र जमले. गावात शोधाशोध सुरू झाली. त्यावेळी हे तिघे संशयित दुचाकीवरून जाताना आढळून आले. गावकऱ्यांनी त्यांना पकडले. त्यांच्याबद्दल संशय आला. त्यामुळे त्यांना पकडून ठेवून पोलिसांना बोलावण्यात आले. जामखेडचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे पथक तातडीने गावात आले. त्यांनी तिघा संशयितांकडे चौकशी केली, त्यांची झडती घेतली असता त्यांनी गुन्हे केल्याचे आढळून आले.

आदित्य उर्फ सोंड्या गणेश पिंपळे (वय वर्ष २० रा.अशोकनगर, श्रीरामपूर) प्रदीप उर्फ चक्क्या चंद्रकांत काळे (वय २१) आणि बाबू फुलचंद काळे (वय २४, दोघेही रा, सदाफुले वस्ती, जामखेड) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Jamkhed Crime Taluka harassment due to burglary during the day

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here