Maratha Reservation: विखे पाटील परत जा, परत जा”, “एक मराठा लाख मराठा” अशा घोषणांनी विरोध करणाऱ्या आंदोलक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
संगमनेर : संगमनेरमध्ये सकल मराठा समाजाच्या सुरू असलेल्या साखळी उपोषणाला भेट देण्यासाठी आलेल्या राज्याच्या महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना काही आंदोलकांच्या घोषणांना सामोरे जावे लागले. “विखे पाटील परत जा, परत जा”, “एक मराठा लाख मराठा” अशा घोषणांनी विरोध करणाऱ्या आंदोलक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला ४० दिवसांचा अवधी दिला होता. हा वेळ संपला तरी देखील सरकारने कोणतीही पावले उचलली नाहीत. यामुळे जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केलं आहे. त्यामुळे राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला असून राज्यातील अनेक गावांनी राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. तसंच जागोजागी मोर्चे, आंदोलने, उपोषणे, रॅली काढून जरांगे यांना समर्थन देण्यात येत आहे. राज्यभरातून त्यांच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून संगमनेरमध्ये देखील बस स्थानकाच्या प्रवेशद्वारात बाहेर मराठा समाजाने साखळी उपोषण सुरू केले आहे.
जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषणाला बसलेल्या उपोषण कर्त्यांना भेट देण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील रविवारी संगमनेरमध्ये आले होते. मंत्री विखे पाटील उपोषणस्थळी येताच काही तरुणांनी त्यांना भेटीसाठी विरोध करत विखे पाटील परत जा, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या. यावेळी पोलिसांनी तरुणांना ताब्यात घेण्यात आले.
पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, उपनिरीक्षक बाळासाहेब यादव यांच्यासह पोलिसांनी तातडीने आंदोलकांना ताब्यात घेत आपल्या वाहनातून पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तरुणांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला.
दरम्यान मराठा समाजाने सुरू केलेल्या आंदोलनाला व्यक्तिशः आपला देखील पाठिंबा असल्याचे मंत्री विखे यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले. मराठा आरक्षण संदर्भात राज्य सरकार अतिशय संवेदनशील आहे. हा प्रश्न सामंजस्याने सोडविण्याची शासनाची भूमिका आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
Web Title: Maratha Reservation Go back Go back Go back Vikhe Patil Go back in Sangamner
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App