अकोलेत सकल मराठा आक्रमक, साखळी उपोषण सुरु, आ. बाळासाहेब थोरात उपोषणस्थळी पण…….
Akole News: अकोले मध्ये पोलीस स्टेशन शेजारी सकल मराठा समाजातर्फे राज्य सरकारचा निषेध करत जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा.
अकोले: राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा परत एकदा चांगलाच पेटला आहे. सरकारला ४० दिवस देऊनही अजून ठोस असा निर्णय मिळाला नाही. त्यामुळे राज्यात पुन्हा नव्याने अंदोलन, प्रचार चालू झाले आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला ४० दिवसांचा अवधी दिला होता. हा वेळ संपला तरी देखील सरकारने कोणतीही पावले उचलली नाहीत. यामुळे जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केलं आहे. त्यामुळे राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला असून राज्यातील अनेक गावांनी राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. तसंच जागोजागी मोर्चे, आंदोलने, उपोषणे, रॅली काढून जरांगे यांना समर्थन देण्यात येत आहे.
अकोले मध्ये पोलीस स्टेशन शेजारी सकल मराठा समाजातर्फे राज्य सरकारचा निषेध करत जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून अकोलेत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत साखळी उपोषण सुरु आहे. खासदार, आमदारांसह सर्वच पक्षातील राजकीय नेत्यांना गावात ‘नो एन्ट्री केली आहे. मराठा आरक्षणामुळे वातावरण चांगले ढवळून निघाले आहे. सरकारला आरक्षणासाठी दिलेली मुदत संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले. त्याचे पडसाद थेट अकोले तालुक्यात दिसून येत आहेत. मराठा समाजातर्फे शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात येत आहेत. साखळी उपोषण, राजकीय नेत्यांना गावबंदी, राजकीय सभा, कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्यात येत आहे. समाजातर्फे करण्यात येत असलेल्या आंदोलनाची दखल घेऊन तत्काळ आरक्षण देण्याची मागणी अकोलेतील तरुणांतर्फे करण्यात आली. मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. तरीही सरकारकडून दखल घेतली जात नाही, सरकारला आणखी किती बळी हवे आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया अकोले ग्रामस्थांनी व्यक्त केली. दरम्यान आज सकाळी माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात हे उपोषणस्थळी आले असता यावेळी ग्रामस्थांनी तेथे येण्यास त्यांना मज्जाव केला. त्यांना शांततेत उपोषणस्थळापासून जाण्यास भाग पाडले.
यावेळी डॉ. अजित नवले, माधवराव तिटमे, बाळासाहेब नवले, गीताराम नवले, शिवाजी नेहे, साईनाथ नवले, परशराम शेळके, निवृत्ती लोटे आदींनी घोषणा देत राज्य सरकारचा निषेध करत जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.
Web Title: Maratha Reservation Aggressive Marathas, chain hunger strike Akole
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App