मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल; भाजपच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
Maratha Reservation: रास्ता रोकोसाठी लोकांना प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल.
मुंबई: मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकेरी आणि खालच्या भाषेत टीका केल्यानंतर आतापर्यंत सबुरीचे धोरण बाळगत असलेले राज्य सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे. यापूर्वी पोलिसांकडून मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. परंतु, सोमवारी पहिल्यांदाच पोलिसांकडून थेट मनोज (Manoj Jarange Patil) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
कालपासून राज्य सरकारकडून जवळपास १०४१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी ४२५ गुन्हे मराठवाड्यात दाखल करण्यात आले आहेत. तर बीड जिल्ह्यातील शिरुर आणि अमळनेरमध्ये मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रास्ता रोकोसाठी लोकांना प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचे समजते.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी मुंबईत भाजप आमदारांची बैठक पार पडली. यावेळी भाजप आमदारांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. आपण मराठा समाजाच्या पाठिशी आहोत, ही बाब आपापल्या मतदारसंघात जाऊन सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवा. मनोज जरांगे पाटील वैयक्तिक स्वार्थासाठी राजकीय भाषा बोलत आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा संयमाने हाताळला पाहिजे. भाजप मराठा समाजाच्या पाठिशी राहणार आहे. यापूर्वीही भाजप सरकारनेच मराठा समाजाला दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात टिकवले. आतादेखील नव्याने दिलेले आरक्षण कोर्टात टिकेल, हा विश्वास लोकांना द्या, अशी सूचना भाजप आमदारांना करण्यात आली आहे. तसेच या बैठकीत भाजप आमदारांनी मनोज जरांगे यांच्या वक्तव्याविषयी नाराजी व्यक्त केली. मनोज जरांगे राजकीय भाषा बोलत असतील तर त्यांना प्रत्युत्तर द्या, असेही भाजप आमदारांना सांगण्यात आले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी दुपारी आमरण उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली. त्याचे रुपांतर साखळी उपोषणात करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मनोज जरांगे आता पुढील एक-दोन दिवस उपचार घेऊन मराठा बांधवांच्या भेटीसाठी गावागावात फिरणार आहेत.
Web Title: Maratha Reservation registered against Manoj Jarange Important decision in BJP meeting
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study