संगमनेरात पोलिसांनी दोन हजार किलो गोमांस पकडले
Breaking News | Sangamner: शहर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून ४ लाख रुपयांचे दोन हजार किलो गोमांस जप्त.
संगमनेर: शहरातील मदिनानगर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि शहर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून ४ लाख रुपयांचे दोन हजार किलो गोमांस जप्त केले आहे. सदर कारवाई बुधवार दि. २० मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता केली आहे. यामुळे अवैधरित्या कत्तलखाने चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना मदिनानगरमधील गल्ली क्रमांक दोनमध्ये एका घरात गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पाटील, सहायक फौजदार लोखंडे, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकातील पोना. राहुल डोके, पोकॉ. राहुल सारबंदे यानी छापा टाकला असता भारतनगरमधील अनिस गुलामहैदर कुरेशी (वय २४) हा गोवंश जनावरांची कत्तल करताना मिळून आला. पथकाने त्याला पकडून अंदाजे ४ लाख रुपयांचे दोन हजार किलो गोमांस जप्त केले.
याप्रकरणी पोना. राहुल डोके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिस कुरेशी याच्यावर भादंवि कलम २६९, ४२९, महाराष्ट्र पशु संरक्षण (सुधारणा) अधिनियम सन १९९५ चे सुधारित सन २०१५ चे कलम ५ (क), ९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.
Web Title: Police seized 2000 kg of beef in Sangamner
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study