मोठ्या शिताफीने सराईत महिलांना अटक; श्रीरामपूर पोलिसांची कामगिरी
Ahmednagar News: धुमाकूळ घालणाऱ्या महिलांच्या सराईत गुन्हेगारी टोळीला श्रीरामपूर पोलिसांनी पाठलाग करत मोठ्या शिताफीने अटक केली, आरोपींकडून तब्बल १७ लाख ७७ हजारांचे चोरीचे दागिने जप्त.
श्रीरामपूर: जिल्ह्यात चोरीच्या व फसवणुकीच्या घटनांत वाढ होत आहे. श्रीरामपूरसह परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या महिलांच्या सराईत गुन्हेगारी टोळीला श्रीरामपूर पोलिसांनी पाठलाग करत मोठ्या शिताफीने शनिवारी (दि. १६) अटक केली, या महिला आरोपींकडून तब्बल १७ लाख ७७ हजारांचे चोरीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी श्रीरामपूर येथे दिली.
नेवासा-श्रीरामपूर रोडवर पाठलाग करत महिला टोळीला अटक करण्यात आली. आसराबाई ऊर्फ लक्ष्मी ऊर्फ आशाबाई तुकाराम पवार (वय ५५, रा. बार्शी नाका, जि. बीड), सुनीता योगेश जाधव (वय २५, रा. गांधीनगर, नाळवंडी नाका, मोहटा देवी मंदिराजवळ, ता. जि. बीड), वसंत विश्वनाथ मुंजाळ (वय ३८, धंदा- मेकॅनिक, एस.टी. डेपो बीड, रा. हिरापूर, ता. गेवराई, जि. बीड), जुबेर रज्जाक पठाण (वय २९, रा. मुन्नावर मस्जिद, तेलगाव नाका, ता. जि. बीड), कैशल्या सर्जेराव गायकवाड (वय ५२, रा. नाळवंडी नाका, जि. बीड), कमल विठ्ठल जाधव (वय ५३, रा. नाळवंडी नाका, खडी मशीनजवळ बीड), सखुबाई सखाराम कुन्हाडे (वय ४०, रा. माऊलीनगर गेवराई, जि. बीड), गवळण पांडुरंग गायकवाड (वय ३५, रा. उकंडा, ता. पाटोदा, जि. बीड), शालनबाई लक्ष्मण जाधव (वय ५५, रा. नाळवंडी, जि. बीड) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
राहुरी कृषी विद्यापीठ येथील प्राध्यापिका धनश्री हंबीरराव सरनौबत या मैत्रिणीला भेटण्यासाठी श्रीरामपूर येथे आल्या होत्या. त्या परत जाण्यासाठी श्रीरामपूर बसस्थानकात आल्या. बसमध्ये बसत असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण चोरट्याने चोरून नेले होते. याबाबत श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. तांत्रिक विश्लेषणात या गुन्ह्यात स्कॉर्पिओ (एमएच १२, जी. एफ ५६३७) चा वापर झाल्याचे समोर आले. ही स्कॉर्पिओ नेवासा येथून श्रीरामपूरकडे येत आहे, अशी माहिती श्रीरामपूर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी हरेगाव फाटा येथे नाकांबदी लावली. सदरची स्कॉर्पिओ येताना पोलिसांना दिसली. चालकाने श्रीरामपूरच्या दिशेने स्कॉर्पिओ पळवली. मोठ्या शिताफीने पोलिसांनी श्रीरामपूरजवळ चारचाकी ताब्यात घेऊन महिला टोळीला अटक केली.
Web Title: Sarai Women Arrested
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App