Home संगमनेर पुणे-नाशिक रेल्वेमार्ग संगमनेर तालुक्यातूनच न्यावा आ. सत्यजीत तांबे यांनी घेतली मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट

पुणे-नाशिक रेल्वेमार्ग संगमनेर तालुक्यातूनच न्यावा आ. सत्यजीत तांबे यांनी घेतली मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट

Breaking News | Sangamner : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाच्या मूळ आराखड्यात बदल, आमदार सत्यजीत तांबे यांनी याच असंतोषाचा वाचा फोडला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

Satyajit Tambe met Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister

संगमनेर:  पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाच्या मूळ आराखड्यात बदल करत हा मार्ग संगमनेर तालुक्याऐवजी शिर्डीकडे वळवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे संगमनेरकरांमध्ये प्रचंड नाराजी असून आमदार सत्यजीत तांबे यांनी याच असंतोषाचा वाचा फोडला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

या मार्गाच्या मूळ आराखड्यानुसार तो संगमनेर तालुक्यातून जाणं अपेक्षित असताना ऐन वेळी हा बदल का केला, असा प्रश्न उपस्थित करत आ. तांबे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. रेल्वेमार्गाच्या मूळ आराखड्यात कोणताही बदल न करता तो संगमनेरमधूनच नेण्यात यावा, अशी आग्रही मागणी करणारं पत्र त्यांनी या वेळी दिलं.

पुणे-नाशिक या दोन महानगरांना जोडणारा रेल्वेमार्ग महारेलच्या माध्यमातून उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. हा मार्ग संगमनेर तालुक्यातून जाण्याचं नियोजन झालं होतं. या रेल्वेमार्गामुळे पुण्यातील चाकण, भोसरी आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि मुसळगाव या चार औद्योगिक वसाहती जोडल्या जाणार आहेत.

त्यामुळे संगमनेर तालुक्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी अधिक प्रमाणात उपलब्ध होण्याची शक्यता होती. तसंच संगमनेरमधील फळे, भाजीपाला, धान्य हा माल थेट महानगरांमध्ये अधिक जलद पोहोचला असता.

तब्बल तीन दशकांनी संगमनेर देशाच्या रेल्वेच्या नकाशावर येणार असल्याने आणि त्यामुळे तालुक्यात समृद्धी येणार असल्याने संगमनेरकरांनी या रेल्वेमार्गाचं स्वागत केलं, असं आ. तांबे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिलं.

राज्य सरकारने महारेलच्या माध्यमातून सिन्नर व संगमनेर तालुक्यात भूसंपादनही केले आहे. एकट्या संगमनेरमधून १०३ खरेदीखतांद्वारे थेट शेतकऱ्यांकडून जमिनी खरेदी करण्यात आल्या. असं असताना अचानक या मार्गात बदल करत तो संगमनेरऐवजी राजगुरूनगरवरून थेट शिर्डीकडे वळवण्याचा निर्णय का घेतला, याबाबतही आ. तांबे यांनी उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली.

या निर्णयामुळे संगमनेरकरांचं मोठं नुकसान होणार असून जनतेत प्रचंड रोषाचं वातावरण निर्माण झाले आहे. असं आ. तांबे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिलं. शिर्डीकडे जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या याआधीच धावत आहेत. स्वेच्छेने शिर्डीला जाणाऱ्या भाविकांसाठी रेल्वेची सोय आहे.

नाशिक-शिर्डी एकमेकांशी जोडलेले आहेत. मात्र संगमनेर अद्याप रेल्वेच्या नकाशावर नाही. त्यामुळे आमच्या भागासाठी हा महत्त्वाचा रेल्वेमार्ग आहे. परिणामी राज्य सरकारने मूळ आराखड्यात बदल न करता हा मार्ग संगमनेरवरूनच न्यावा, अशी मागणी आ. तांबे यांनी केली आहे.

अचानक साडे बदल कोणाच्या सूचनेनुसार?

ज्या मार्गासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात २,४२४ कोटी रुपयांची तरतूद झाली आहे, ज्या मार्गासाठी एकट्या संगमनेर तालुक्यातील १०३ शेतजमिनी खरेदीखत देत ताब्यात घेण्यात आल्या, तो मार्ग ऐन वेळी शिर्डीमार्गे वळवण्याचा निर्णय राज्य सरकारने कोणाच्या सूचनेनुसार घेतला, असा प्रश्नही आ. तांबे यांनी उपस्थित केला आहे. मूळ आराखडा बदलून अचानक एखादा रेल्वे प्रकल्प दुसऱ्या मार्गाने वळवणं सोपं असतं का, याबाबतचा शक्यता अहवाल तपासण्यात आला का, असे अनेक प्रश्न आ. तांबे यांनी उपस्थित केले.

Web Title: Satyajit Tambe met Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here