Home संगमनेर सुधीर तांबेंचं मोठं विधान; म्हणाले, “भाजपात गेले असते तर आज…

सुधीर तांबेंचं मोठं विधान; म्हणाले, “भाजपात गेले असते तर आज…

Sudhir Tambe On Balasaheb Thorat: माजी आमदार सुधीर तांबे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाबद्दल भाष्य करताना एक मोठं विधान केलं.

Sudhir Tambe On Balasaheb Thorat Sangamner 

संगमनेर: बाळासाहेब थोरात यांच्या पराभवानंतर आज मतदारसंघात कार्यकर्त्याचा संवाद मेळावा पार पडला. यावेळी मेळाव्यात बोलताना माजी आमदार सुधीर तांबे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाबद्दल भाष्य करताना एक मोठं विधान केलं. “साहेबांचं (बाळासाहेब थोरात) काय चुकलं? मला वाटतं की ते भाजपामध्ये गेले असते तर मंत्री झाले असते”, असं सुधीर तांबे यांनी म्हटलं. त्यांच्या या विधानाची चर्चा रंगली आहे.

सुधीर तांबे म्हणाले की,  “राज्यात ज्या-ज्या भागाचं नेतृत्व मोठे नेते करतात तेथे देखील पाण्याचे प्रश्न सुटलेले नाहीत. मात्र, संगमनेरमध्ये आपण पाण्याचा प्रश्न सोडवला. निळवंडे धरणातून पाणी आपण या ठिकाणी आणलं. जे-जे मंत्रालय बाळासाहेब थोरात यांनी सांभाळलं, आता आम्ही महाराष्ट्रभर फिरतो तर आम्हाला लोक सांगतात. आता नांदगावला गेलं तर लोक सांगतात की आमचं एक धरणाचं काम वर्षांनुवर्ष अडलं होतं. ते काम त्यांनी केलं. तेच निफाडमध्येही लोक असंच सांगतात. महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा सर्व लोक चांगलं सांगतात”, असं सुधीर तांबे यांनी म्हटलं.

“बाळासाहेब थोरात यांनी जे-जे मंत्रालय सांभाळलं ते सक्षमपणे सांभाळलं. त्या ठिकाणी त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. मात्र, या निवडणुकीत झालेला पराभव नाही तर घात आहे. कारण चुकीचा प्रचार, चुकीच्या बातम्या पेरायच्या, खोटे व्हिडीओ व्हायरल करायचे? अरे तुम्ही (विरोधक) समाजाला कुठे घेऊन चाललात?एवढा द्वेष का निर्माण करायचा? तसेच मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर झाला. त्यामुळे या सर्वांचा परिणाम हा झाला. आता काही अदृश्य शक्तीबाबतही लोक चिंता करत आहेत”, असं म्हणत सुधीर तांबे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

 “आपल्याला विकसित भारत घडवायचा आहे. मग जाती-जातीमध्ये भांडणे लावून आपण विकसित भारत घडवणार आहोत का? आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही अशा प्रकारे न्याय देणार आहात का? तरुणांची स्वप्न अशा पद्धतीने पूर्ण होणार आहेत का? अशा प्रकारचं राजकारण या देशात सुरु आहे. आता साहेबांचं (बाळासाहेब थोरात) काय चुकलं? मला वाटतं की ते भाजपामध्ये गेले असते तर मंत्री झाले असते. मात्र, आपल्याला आवडलं असतं का? जे काही राजकारणातील पावित्र्य आणि जे काही तत्व आहेत, ते तत्व जपून ते काम करत आहेत”, असंही सुधीर तांबे यांनी म्हटलं.

Web Title: Sudhir Tambe On Balasaheb Thorat Sangamner 

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here