काळाचा घाला; अकोलेतील चौघांचा करूण अंत
Sangamner Accident: चंदनापुरी गावाच्या शिवारात धावत्या कारवर ट्रक उलटून अपघात, ट्रकच्या खाली दाबल्याने चार जणाचा मृत्यू.
संगमनेर : भरधाव जाणार्या आयशर टेम्पो समोर चाललेल्या टोयाटो कारवर उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही अपघाताची घटना पुणे-नाशिक महामार्गावर चंदनापुरी शिवारात 8.00 वाजेच्या सुमारास घडली. मयतांमध्ये दोन पुरुष, एक महिला व 2 वर्षाच्या लहान बाळाचा समावेश आहे. गाडीचा चक्काचूर झाला आहे.
सुनिल दिनकर धारणकर (वय 65, रा. सुभाष रोड, अकोले), आशा धारणकर (वय 42), ओजस्वी धारणकर (वय 2 वर्ष), अभय विसाळ (रा. अकोले) अशी मयतांची नावे आहेत. तर अस्मिता अभय विसाळ (रा. अकोले) या जखमी झाल्या आहेत.
एमएच 17 एजे 2696 या टोयाटो इटॉस कारने सुनिल धारणकर हे आपल्या कुटुंबियांसह पुण्याहून अकोले येथे येत होते. दरम्यान चंदनापुरी शिवारात आल्यानंतर पुण्याहूनच नाशिकच्या दिशेने जाणारा आयशर टेम्पो क्रमांक युपी 24 टी 8550 हा अचानक समोर चाललेल्या टोयाटो कारवर जावून उलटला. त्यामुळे कारमधील सुनिल दिनकर धारणकर (वय 65, रा. सुभाष रोड, अकोले), आशा धारणकर (वय 42), ओजस्वी धारणकर (वय 2 वर्ष), अभय विसाळ (रा. अकोले) हे दबले गेले. क्षणात रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली. चंदनापुरीच्या ग्रामस्थांनी घटनास्थळाच्या दिशेने धाव घेतली. आरडाओरड सुरु होता. कारमधील जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु होता.
कारमधील जखमी आरडाओरड करत होते. परिस्थिती अत्यंत भयानक होती. ग्रामस्थांनी कारमधील व्यक्तींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र टेम्पोच्या खाली कार असल्यामुळे एकालाही बाहेर काढणे मुश्किल होते. स्थानिकांनी हायड्रोलीक क्रेन बोलविल्यामुळे टेम्पो बाजुला करण्यास मदत झाली. त्यानंतर कारमधील जखमींना बाहेर काढण्यात आले. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती. कारमधील जखमींना वेगवेगळ्या रुग्णवाहिकेमधून संगमनेरात खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले. तर अस्मिता विसाळ या अपघातातून बचावल्या आहेत.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, तालुका पोलीस निरीक्षक ढुमणे, महामार्ग पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या दुभाजकावर पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
हिवरगाव टोल नाका येथे हायड्रोलीक क्रेन उपलब्ध नसल्याने बाहेरुन क्रेन बोलवावी लागली. अपघात घडला त्यावेळी तातडीने क्रेन उपलब्ध झाली असती तर कदाचित अपघातातील जखमींचे प्राण वाचले असते. टोलनाका प्रशासनाच्या हलगर्जीपणाबाबत चंदनापुरी ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. घटनेची माहिती अकोले शहरात समजताच अकोल्यातून हळहळ व्यक्त करण्यात आली.
Web Title: Truck overturns on a running car, four people die after being crushed under the truck
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App