३५ वर्षीय विवाहितेच्या अंगावर वीज कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू
Sinnar | सिन्नर: सिन्नर तालुक्यातील दुशिंगवाडी येथे काल सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शेतात चारा काढण्यासाठी गेलेल्या विवाहितेच्या अंगावर वीज कोसळल्याने विवाहितेचा दुर्देवी मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे.
उज्वला प्रदीप ढमाले या ३५ वर्षीय या महिलेच्या अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाला आहे. बुधवारी सायंकाळी पाच वाजेपासून सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात सायाळे, मळढोण, पाथरे, मिरगाव, दुशिंगवाडी भागात विजांचा कडकडाट सुरू होता. जोराने वाहणारे वारे आणि पावसाळी ढगांनी गर्दी केली होती
दुशिंगवाडी शिवारात पान मळा रस्त्यावर ढमाले वस्ती असून प्रदीप ढमाले हे आपल्या कुटुंबासोबत वास्तव्यास आहेत. पावसाळी वातावरण तयार झाल्याने उज्वला ढमाले आणि त्यांची जाव माया प्रकाश ढमाले या दोघी एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात जनावरांसाठी चारा काढत होत्या. त्या दरम्यान प्रचंड कडकडाट करत वीज कोसळली. जीव वाचवण्यासाठी दोघी दोन दिशांना झाडाच्या आडोशाला धावल्या. मात्र उज्वला यांना कोणतीही संधी मिळाली नाही. अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना समजल्यावर नातेवाईक आणि ग्रामस्थांनी त्यांना तातडीने सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले मात्र तेथे उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान वादळी वारे व पावसाचे दिवस असल्याने पावसाचे वातावरण निर्माण झाल्यास नागरिकांनी सुरक्षित स्थळी थांबणे आवश्यक आहे. मुख्यतः शेतकरी वर्ग अशा वेळेस घाईघाईने चारा काढणे व झाकपाक करण्याची लगबग सुरु करतात आणि अपघातास कारणीभूत ठरतात.
Web Title: 35-year-old married woman death in lightning strike