धक्कादायक! अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपी हातकडीसह पोलिसांच्या ताब्यातून फरार
बीड | कडा: पोलीस ठाण्यात नेत असताना अत्याचार प्रकरणातील (Woman abused)आरोपी हातकडीसह पोलिसांच्या ताब्यातून फरार झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास गारमाथा येथे घडली. विकास कैलास गायकवाड वय २४ रा. बीड सांगवी असे आरोपीचे नाव आहे. तो २०१९ पासून एका अत्याचाराच्या प्रकरणात पोलिसांना हवा होता.
आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे २०१९ मध्ये एका अत्याचार प्रकरणात विकास कैलास गायकवाड हा आरोपी आहे. तो अंभोरा पोलिसांना अनेक महिन्यांपासून गुंगारा देत होता. मात्र, पोलिसांनी त्याला बुधवारी बीड येथून ताब्यात घेतले होते. गुरूवारी बीडवरून पोलीस त्याला अंभोरा पोलिस ठाण्यात घेऊन जात होते. बीड- धामणगांव-नगर राज्य महामार्गावरील गारमाथा येथे गाडी लघुशंकेसाठी थांबवली. यावेळी आरोपी विकास गायकवाड हा पोलिसांच्या हाताला झटका देऊन हातकडीसह पळाला. पोलिसांनी पाठलाग केल्यानंतरही आरोपी मिळून आला नाही. गंभीर गुन्ह्यातील आरोपी ताब्यात ठेवण्यात पोलिस कमी पडल्याचे दिसून आले.
Web Title: accused in the woman abused case escaped from police custody with handcuffs