सरकारी शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची भाऊसाहेब चासकर यांची मागणी
अकोले: शालेय गणवेशाच्या वाटपाबाबत शासनाचे धोरण सर्वसमावेशक असावे, अशी अपेक्षा व्यकत करताना सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्याा सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश द्यावेत, अशी मागणी ॲक्टिव्ह टीचर्स फोरमचे संयोजक शिक्षणतज्ज्ञ भाऊसाहेब चासकर यांनी केली आहे.
शिक्षणमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात चासकर यांनी म्हटले आहे की, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थी, अनुसूचित जाती-जमातीचे तसेच दारिद्ररेषेखालील विद्यार्थ्यांना शालेय गणवेशा मोफत दिले जाता. मात्र, भटक्या विमुक्त जाती-जमाती, इतर मागास आणि सर्वसाधारण प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिले जात नाहीत. जिल्हा परिषदांच्या शाळांत शिकणऱ्या बहुसंख्य विद्यार्थ्यांची आर्थक स्थिती बेताचीच असते. आर्थिकदृष्टया मागास असले, तरी तांत्रिकदृष्टया दारिद्रयरेषेखालील गटात मोडत नसल्याने हे विद्यार्थी योजनेपासून वंचित राहतात. शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांमध्ये कसलाही फरक न करता शाळेत सहभागी होण्याचा प्रत्येक विद्यार्थ्यांचा अधिकार मान्य केला आहे.
वंचित विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेता योजनेचा विस्तार करताना शासनावर फार मोठा आर्थिक भार पडणार नाही, याकडे लक्ष वेधताना गणवेश वाटपाबाबत सर्वसमावेशक धोरण घेऊन जिल्हा परिषद शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांप्रमाणे मोफत गणवेश द्यावेत, अशी मागणी चासकर यांनी शिक्षणमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.
Website Title: Bhausaheb Chaskar’s Demand For Uniforms To All Students Of Government Schools