लाचखोर तलाठी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात रंगेहाथ
कर्जत | Bribary Case: मिरजगाव येथे एक लाचखोर तलाठी १२ हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यश आले आहे.
चंद्रकांत गजाबा बनसोडे वय ५६ असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. त्याच्यासोबत असणारा सहकारी खासगी सहायक अमित सर्जेराव शिर्के वय ४० रा. चांदा खुर्द कर्जत हा फरार झाला आहे.
गुरव पिंपरी येथील शेतकऱ्याने त्यांच्या भावाच्या शेतीचे वाटणीपत्र करून त्याद्वारे फेरफार नोंद करण्यासाठी गुरव पिंपरी येथील तलाठ्याकडे अर्ज केला होता. ही फेरफार नोंद करण्यासाठी तलाठी बनसोडे व त्याच्या सहायकाने २० हजार रुपयांची मागणी केली होती. संबंधित शेतकऱ्याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर तडजोड करून १२ हजार रुपये देण्याचे ठरले.
१० जूनला मिरजगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ही रक्कम स्वीकारण्याची तयारी तलाठ्याने दर्शविली. त्यानुसार विभागाच्या पथकाने सापळा रचत तलाठी बनसोडे यास १२ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. यातील तलाठ्याचा खासगी सहायक अद्याप फरार आहे.
लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासणे, उपाधीक्षक हरीश खेडकर, निरीक्षक दीपक करांडे या पथकाने ही कारवाई केली आहे.
Web Title: Bribary Case Rangehath in the net of Talathi Bribery Department