मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वासू पहाटे पहाटेच जरांगे यांच्या भेटीला, पडद्यामागे काय?
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभा निवडणुकीत कोणताही फटका बसू नये, यासाठी खबरदारी म्हणून अनेक नेते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला.
मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांना मराठा मतांचा फटका बसला होता. त्यामुळे आता अनेक नेते हे सावधगिरीचा पर्याय अवलंबताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये विविध पक्षातील आमदार, नेते हे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत. या भेटीगाठी सहसा रात्री उशिरा किंवा पहाटे होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक आणि विश्वासू मंगेश चिवटे यांनी आज पहाटे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.
लोकसभा निवडणुकीत जरांगे पॅटर्न हा चांगलाच चालला होता. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणताही फटका बसू नये, यासाठी खबरदारी म्हणून अनेक नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक आणि विश्वासू मंगेश चिवटे यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. काल रात्री शिवसेना शिंदे गटाची यादी जाहीर झाली. त्यानंतर आज पहाटेच मंगेश चिवटे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही भेट अत्यंत महत्त्वाची असल्याचे बोललं जात आहे.
बीडचे खासदार आणि शरद पवार गटाचे नेते बजरंग सोनवणे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. दुसरीकडे परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभेचे काँग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर यांनी अंतरवाली सराटी गाठत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. बजरंग सोनावणे, सुरेश वरपूडकर, संगीता ठोंबरे, राहुल पाटील हे सर्व नेते मराठवाडा तसेच बीड जिल्ह्याशी संबंधित आहेत.
Web Title: Chief Minister Eknath Shinde’s confidant met Jarange early in the morning
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study