धक्कादायक! तीन वर्षीय चिमुरड्याला खेळता- खेळता विहिरीत ढकलले
Breaking News | Pune: तीन वर्षीय चिमुरड्याला इतर अल्पवयीन मुलांनी विहिरीत ढकलून दिल्याची धक्कादायक घटना.
पुणे: पिंपरी- चिंचवडमध्ये तीन वर्षीय चिमुरड्याला इतर अल्पवयीन मुलांनी विहिरीत ढकलून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अग्निशमन दल, चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चिमुरड्याला विहिरीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. या घटनेत चिमुरड्याचा मृत्यू झाला असण्याची शक्यता पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी व्यक्त केली आहे. वसीम नाज्जीमुद्दीन खान असं चिमुरड्याचं नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घराजवळ असलेल्या विहिरी जवळ तीन ते चार मुलं खेळत होती. त्यापैकी, काही मुलांनी खेळत असताना यातील एका मुलाला थेट विहिरीत ढकलून दिले. तीन वर्षीय वसीम हा विहिरीत पडला असल्याची माहिती इतर मुलांनी त्यांच्या कुटुंबीयांना दिली. मग, कुटुंबीयांनी चिखली पोलिसांना माहिती दिली.
चिखली पोलीस तसेच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून विहिरीतून मुलाला बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, या घटनेत चिमुरड्याचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घटनास्थळी चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, गुन्हे पोलीस निरीक्षक राजेंद्र बर्गे यासह इतर पोलीस कर्मचारी उपस्थित आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
Web Title: Three-year-old boy was pushed into a well while playing
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study