पाणलोटक्षेत्रात संततधार सुरूच, भंडारदरा, मुळा, निळवंडे आढळा धरण इतक्या टक्क्यांवर पोहोचले
Akole Dam Update: जाणून घ्या अकोले तालुक्यातील धरणांतील पाण्याचा साठा किती झाला आहे. पावसाचा (Rain) जोर काहीसा ओसरला आहे मात्र संततधार सुरूच आहे.
अकोले: भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरूच आहे. शनिवारी सायंकाळी भंडारदरा धरणातून प्रवरा पात्रात 6470 क्युसेक विसर्ग सुरू होता. भंडारदरा परिसरातील ओढे, नाले दुथडी, भात खाचरे तुडूंब भरून वाहत आहेत. या पावसामुळे सर्व परिसर जलमय झाला आहे. सोडण्यात आलेल्या या पाण्यामुळे रंधा धबधब्याचा परिसर जलमय झाला आहे. निळवंडे धरण 70 टक्के भरले आहे. तर आढळा धरण रविवारी 60 टक्के भरल्याचा अंदाज आहे.
शुक्रवारी पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे. काल शनिवारी सकाळी झालेल्या 24 तासातील पाऊस पुढीलप्रमाणे-घाटघर 175 मिमी, रतनवाडी 179 मिमी, भंडारदरा 115 मिमी, पांजरे 125 मिमी, वाकी 95 मिमी याप्रमाणे आहे.
सकाळपर्यंत भंडारदरा धरणात 675 दलघफु नवीन पाणी आले होते. सकाळी भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 9275 दलघफु होता तर सायंकाळी तो 9285 दलघफु (84.11 टक्के) होता. शनिवारी सायंकाळी भंडारदरा धरणाच्या स्पिल्वे मधून 5635 क्युसेक तर वीजनिर्मिती केंद्रातून 835 क्युसेक विसर्ग सुरू होता. निळवंडे धरणाचा पाणीसाठा शनिवारी सायंकाळी 5798 दलघफु झाला होता. निळवंडे धरणही 69.62 टक्के भरले आहे. दिवसभरात भंडारदरा येथे 27 मिमी पाऊस पडला.
मुळा पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अजूनही टिकून असल्याने मुळा नदी वाहती आहे. काल दिवसभरात हरिश्चंद्रगड परिसरात पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे मुळा नदीचा प्रवाह टिकून आहे. मुळा नदीपात्रातून कोतुळ येथून सकाळी 6 वाजता 7310 क्युसेकचा विसर्ग सुरू होता. दुपारी 12 वाजता तो 5327 क्युसेकवर आला तर दुपारी 3 वाजता 5638 क्युसेकवर गेला. सायंकाळी 6 वाजता त्यात वाढ होऊन तो 6260 क्युसेक झाला.
मुळा धरणाचा पाणीसाठा सकाळी 6 वाजता 16124 दलघफु होता. तो सायंकाळी 6 वाजता 16439 दलघफु झाला. दिवसभरातील 12 तासात मुळा धरणात 315 दशलक्ष घनफुट नवीन पाणीसाठा झाला. जिल्ह्याची जीवनदायनी असणारे जिल्ह्यातील सर्वात मोठे असणारे 26 टीएमसी क्षमतेचे मुळा धरण 63.22 टक्के भरले आहे.
आढळा खोर्यातही पावसाचे प्रमाण चांगले असून सांगवी व पाडोशी हे लघु पाटबंधारे प्रकल्प भरले असून आढळा नदी वाहती झाली आहे. त्यामुळे आढळा धरणाच्या पाणी साठ्यातही वाढ सुरू आहे. शनिवारी सायंकाळी आढळा धरणाचा पाणी साठा 623 दलघफु (58.77 टक्के) झाला होता.
Web Title: Rain Update Bhandardara, Mula, Nilwande dams reached this percentage
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App