संगमनेर शिवसेना तालुकाध्यक्ष पदाधिकाऱ्याची हकालपट्टी, तर या नेत्याची नियुक्ती
संगमनेर: शिवसेना (Shiv Sena) तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांची तालुकाध्यक्ष पदावरून हकालपट्टी तर उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब हासे यांची नियुक्ती.
संगमनेर: शिवसेनेत राहून देखील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आमदार वैभव पिचड यांच्याशी सलगी ठेवणाऱ्या तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांची तालुकाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. तर आहेर यांच्या जागेवर उपजिल्हाप्रमुख असलेल्या भाऊसाहेब हासे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून एक मोठा गट घेऊन बाहेर पडल्यानंतर शिवसेनेचे दोन गटात विभाजन झाले. त्यामुळे शिवसेनेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने हा लढा थेट न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव देखील तात्पुरत्या स्वरूपात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून गोठविले गेल्यामुळे पदाधिकारी कार्यकर्ते देखील दोन गटात विभागले गेले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना अशा दोन गटात शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांची विभागणी झाल्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटत होते. त्यामुळे दोन्ही गटाकडून शिवसेनेची नव्याने बांधणी केली जात आहे या पार्श्वभूमीवर या निवडींना महत्त्व आहे.
आहेर यांच्याविषयी अनेकदा तक्रारी करून देखील पक्षांतर्गत आश्रयामुळे दखल घेतली जात नव्हती आता मात्र अचानकपणे त्यांना पदावरून हटविण्यात आले आहे. मध्यंतरीच्या काळात आहेर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देखील दिला होता. मात्र पक्षातील काही लोकांच्या आश्रयामुळे तो स्वीकारला गेला नव्हता. तसेच आहेर यांची महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आमदार वैभव पिचड या भाजपातील नेत्यांसोबत आहेर यांची वाढती सलगी लक्षात घेत त्यांच्या विरोधात अनेक कार्यकर्त्यांनी वरिष्ठांकडे तक्रारी देखील केल्या होत्या. शिवसेनेत असलेले आहेर नेमके कोणत्या पक्षात आहेत, याविषयी देखील चर्चा होत असत. आहेर यांचे शिवसेनेत वरिष्ठ नेत्यांसोबत देखील सलोख्याचे संबंध होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात तक्रारी येऊन देखील त्यांना पक्षात नेहमीच अभय मिळत गेले. संगमनेर तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेरातील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांसोबत् नुकताच संवाद साधला होता यावेळी देखील या पदाधिकाऱ्यांसोबत आहेर उपस्थित होते.
शनिवारी शिवसेनेच्या अहमदनगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी शिवसेनेचे मुखपत्रात जाहीर करण्यात आली आहे. यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी नवे पदाधिकारी देण्यात आले आहेत. संगमनेरात देखील काही पदाधिकाऱ्यांचा खांदेपालट करण्यात आला आहे. पदावरून गच्छंती झाल्यानंतर जनार्दन आहेर आणि त्यांचे समर्थक आता काय निर्णय घेता येत याकडे लक्ष लागले आहे.
Web Title: Sangamaner Shiv Sena taluka president sacked
See Latest Marathi News, Ahmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App