Home अहमदनगर पोलीस भरती दरम्यान धावताना संगमनेरच्या तरुणाचा मृत्यू

पोलीस भरती दरम्यान धावताना संगमनेरच्या तरुणाचा मृत्यू

Breaking News | Pune: पोलिस दलातील भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणीत धावणाऱ्या तुषार भालके या तरुणाचा मृत्यू. (Dies)

Sangamner youth dies while running during police recruitment

पुणे : पुणे शहर पोलिस दलातील भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणीत धावणाऱ्या तुषार भालके या तरुणाचा मृत्यू झाला. शनिवारी (दि. ६) सकाळी सव्वाआठच्या सुमारास सोळाशे मीटर धावताना शेवटच्या राउंडला भालके कोसळला. त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

भालके याच्या किडन्या निकामी झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, मृत्यूमागचे कारण समजले नाही. शवविच्छेदनानंतर मृत्यूमागचे निश्चित कारण समजेल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. तुषार बबन भालके (वय २७) हा तरुण मूळचा नगर जिल्ह्यातील संगमनेरजवळील कोठे बुद्रुक गावचा आहे. शेतकरी कुटुंबातील तुषार गेल्या काही महिन्यांपासून पोलिस भरतीची तयारी करत होता. पुणे पोलिसांच्या भरती प्रक्रियेत तो सहभागी झाला होता. शनिवारी शिवाजीनगर पोलिस मुख्यालयातील कवायत मैदानावर मैदानी चाचणी सुरू आहे. भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या उमेदवारांना क्रमांक (चेस्ट नंबर) देण्यात आले आहे. शनिवारी सकाळी आठच्या सुमारास मैदानी चाचणी सुरू झाली.

मैदानी चाचणीसाठी धावण्यासाठी १६०० मीटरचे अंतर देण्यात आले होते. भालके याने तीन राऊंड पूर्ण केले. मात्र शेवटच्या राऊंडला तो चक्कर येऊन खाली कोसळला. त्याला मैदानावरील अधिकारी कर्मचाऱ्यांनी थांबवले. मात्र अंतर थोडे राहिले आहे असे सांगून तो परत उठून धावायला लागला. त्यानंतर मात्र तो परत कोसळला. त्याला तत्काळ मैदानावर तैनात असलेल्या वैद्यकीय पथकाने उपचारासाठी हलवले. मात्र, त्याची परिस्थिती पाहता त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा रक्तदाब कमी झाला होता. त्यानंतर अवयव निकामी झाले. दुपारी दोनच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली. तुषारच्या पश्चात आई-वडील, बहीण असा परिवार आहे. त्याच्या कुटुंबीयांना याबाबतची माहिती कळविण्यात आली आहे. ससून रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात मृतदेह देण्यात येणार आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूमागचे निश्चित कारण समजेल, असे पोलिस उपायुक्त पवार यांनी नमूद केले.

Web Title: Sangamner youth dies while running during police recruitment

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here