Home अहमदनगर विनाअनुदानित शिक्षकांनी आत्महत्या का करू नये

विनाअनुदानित शिक्षकांनी आत्महत्या का करू नये

Non Grant Teachers

विनाअनुदानित शिक्षकांनी (Non Grant Teachers) आत्महत्या का करू नये…?

वि. शि. : हॅलो सर/मॅडम मी….   बोलते/बोलतो

प्राचार्य : हो बोला!

वि. शि. : मी आणि माझं कुटुंब, कोरोनाबधित आहे सर, पगारा संदर्भात बोलायचं होतं.

प्राचार्य : तुम्हाला तर माहितीचे विद्यार्थ्यांनी फी भरलेली नाही.

वि. शि. : प्लिज सर…

प्राचार्य :(बोलणं तोडत) हॅलो आवाज येत नाही,हॅलो हॅलो…

वि. शि. : calling…(परत कॉल करतात)

प्राचार्य : cut ( फोन बंद करून ठेवतात)

किती दिवस झाले शिक्षक भरती निघाली नाही माहीत नाही. परंतु दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांचे लोंढेच्या लोंढे  अध्यापन शास्त्राची degree घेऊन शिक्षण संस्थांची उंबरे झिजवताना पहायला मिळतात. त्याला मीही अपवाद नाही.

अगदी पहिलीपासून म्हटलं तरी वावगं ठरू नये, शिक्षणाच्या बाजारात होरपळून निघायचं. मग 35-40 हजारांची फी भरून शिक्षण शास्त्राच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा. फी भरायची ऐपत नसेल तर कर्ज काढून प्रवेश घ्यायचा, पण प्रवेश मात्र घ्यायचाच. शिकता शिकता कुठं तरी काम करून कर्ज फेडत दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा. एवढं करूनही या शिक्षणाने मांडलेला छळ थांबत नाही. मग अध्यापन शास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या त्या विद्यार्थ्याने  आपली शिक्षक किंवा प्राध्यापक बनण्यासाठीची लायकी सिद्ध करायची ती CET/TET च्या रूपाने. पुढे अनेक वर्षे त्यातच अडकून पडायचं…

एवढी सगळी टप्पे पार करताना आयुष्यावर नाराज झालेल्या त्याने मग रक्ताळलेल्या पावलाने आणि खचलेल्या हृदयाने कुठेतरी 5-8 हजाराची नोकरी पकडायची आणि तितच जगण्याचा केविलवाणा प्रयत्न करायचा. आता तो तुटपुंजा पगारही वेळेवर न मिळाल्याने कुटुंब आहेच टोमणे मारायला. “मस हुशार होता/होती पण काय… जाऊद्या आता”  हे ऐकत त्याने फक्त खचतच रहायचं. अशातच कोरोना सारखी अनपेक्षित संकटं आली की मरण्यासाठी सज्ज रहायचं. एवढंच त्याचं आयुष्य बनून राहिलंय. मग येतात आपल्याला ऐकायला बातम्या ‘आर्थिक विवंचनेतून शिक्षकाची आत्महत्या’ वगैरे वगैरे. आपण काय तर थोडा वेळ हळहळ व्यक्त करतो आणि परत सगळं ‘जैसे थे’ होऊन जातं.

कोरोनाच्या काळात अनेक लोक बेरोजगार झाले. त्यात विनाअनुदानित शिक्षकांचा भरणा (बेरोजगारीत) मोठ्या प्रमाणावर आहे. ऑनलाइन शिक्षणाने विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांचंही कंबरडं मोडलं. तासिका तर घ्यायच्याच पण पगार मात्र नाही… विद्यार्थी न पालक म्हणतात ‘जर शाळाच नाही सुरू तर फी कसली भरू’ आणि शिक्षणसंस्था म्हणतात ‘ विद्यार्थ्यांनी फीच भरली नाही तर पगार कुठून करू’ पण तासिका मात्र बंद करता कामा नये. या सगळ्यात होरपळलं कोण तर शिक्षक… कसं जगायचं कसं त्याने?

खरतर गलेलठ्ठ खासगी शिक्षणसंस्थानी विद्यार्थी व पालकांची भरपूर लूट केली पण शिक्षकाला मात्र कधीच न्याय दिला नाही. कोरोनाच्या काळात आज या covid centre ला मदत केली, उद्या दुसऱ्याच कुठल्यातरी ठिकाणी अन्न आणि फळे वाटप केली, पर्वा तिसरीकडेच काहीतरी केलं. अशा प्रकारे यांच्या समाजसेवेची मिसाल रोज एका news channel किंवा वर्तमानपत्राची हेडलाइन बनली. पण यांच्याकडे निम्म्या पगारावर काम करणाऱ्या शिक्षकाची घरेच्या घरे कोरोनाने उपचाराविना  किंवा पैशाअभावी योग्य उपचार न मिळाल्याने भुईसपाट झाली तरी यांना जाग नाही आली. त्याने आपणच केलेल्या कामाची भीक यांच्याकडे मागितली, ती आपल्या कुटुंबासाठी, आपल्या लेकरांच्या पोटासाठी पण यांच्या पाषाण हृदयाला पाझर नाही फुटला. शिक्षकालाही कोरोना होतो, त्यालाही कुटुंब आहे हे जणू काही हे विसरलेच…

मध्यंतरी शिक्षकांच्या आत्महत्येच्या बातम्या झळकल्या. शिक्षक कुठेतरी शेतमजुरी, विटभट्टीवर काम करताना दाखवला गेला. पण या सगळ्याचं पुढे काय झालं? आज तो शिक्षक काय करतोय? त्याची ती अवस्था पाहून काही उपाययोजना  केली गेली का? आणि केलीच ‘निम्म्या पगाराची’ तर तो तेवढा तरी त्याला मिळाला का? याचा पाठपुरावा कोणी केलाच नाही. प्राचार्यांचा तो तेव्हा बंद झालेला फोन अजून चालू झालाच नाही. त्याला त्याच्या अवस्थेत सोडून दिलं गेलं…

त्याच्या कुटुंबाचे होणारे हाल, शिक्षण आणि कौशल्य असून त्याची होणारी उपेक्षा, वारंवार भयावह विचारांनी त्याच्या मनात घातलेला पिंगा, त्याच्या मनाची होणारी तगमग, तळमळ, त्याला आलेले नैराश्य आणि बरच काही… या सगळ्यातून प्रश्न पडतो विनाअनुदानित शिक्षकाने आत्महत्या का करू नये? का झाली त्याची ही अवस्था? आणि या सगळ्यात दोष कोणाचा? झोपलेल्या सरकारचा…, लबाड, गलेलठ्ठ शिक्षणसंस्थांचा … की त्या हतबल शिक्षकाचा…

गीतांजली पवार ने ता. संगमनेर शेअर केलेले विनाअनुदानित शिक्षकांचे वास्तव जीवन…

Web Title: Why Non Grant teachers should not commit suicide

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here