Ahmednagar Accident News: अहमदनगर जिल्ह्यात तीन अपघाताच्या घटना घडल्या आहेत.
आढळगाव: आढळगाव-जामखेड राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी खोदलेल्या रस्त्यावर कार उलटली. तिघेही प्रवासी बचावले असले तरी कारचे मोठे नुकसान झाले. खोदलेल्या रस्त्यामुळे गेल्या पंधरवड्यात तीन दुचाकी अपघातग्रस्त झाल्या आहेत.
शनिवारी (दि. २) मिरजगावहून (ता. कर्जत) काष्टीच्या दिशेने निघालेली कार (क्र. एमएच १२ व्हीक्यू ८९६३) आढळगाव परिसरात आली असता राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी खोदलेल्या रस्त्यावरील दगडांमुळे कार उलटली आणि लगतच्या विजेच्या खांबावर धडकली. कारमधील तिघांना किरकोळ दुखापत झाली. प्रवासी बचावले असले तरी अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या पंधरवड्यात तीन दुचाकीस्वारांना खोदलेल्या रस्त्याचा फटका बसला आहे.
उड्डाणपुलावर दुचाकीचा अपघात; एक ठार, एक जखमी
अहमदनगर: अहमदनगर शहरातील उड्डाणपुलावर रविवारी (दि.3) सकाळी झालेल्या दुचाकीच्या अपघातात एकजण ठार झाला, तर अन्य एकजण जखमी झाला. स्टेट बँक चौक ते चांदणी चौकदरम्यान असलेल्या सेल्स टॅक्स विभागाच्या कार्यालयासमोर हा अपघात झाला. छत्रपती संभाजीनगर येथून दुचाकीवरून (क्र. एमएच २० सीव्ही ४०९८) पती-पत्नी पुण्याकडे जात होते. भरधाव वेगाने ते उड्डाणपुलावरून जात असताना वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला. उड्डाणपुलाच्या वळणावर वाहन कठड्याला घसरून दुचाकी चालक पुलावरून खाली पडला. मोठ्या प्रमाणात मार लागल्याने चालक जागीच मयत झाला, पत्नी जखमी झाली. तिला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान मृताची ओळख पटली नसल्याचे सांगण्यात आले.
श्रीरामपूर: कार अपघातात तीन जण जखमी
खैरी निमगाव : श्रीरामपूर-कोपरगाव रस्त्यावर खैरी निमगाव – गोंडेगाव शिवारात वीस चारीजवळ भरधाव वेगात आलेल्या कार गाडीचा (क्रमांक. एम.एच. 48 एस 2257) काल दुपारच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्या तीन जणांना लोणी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पुणतांब्याहून श्रीरामपूरच्या दिशेने ही कार चालली होती. गाडीचा वेग जास्त असल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या रस्त्याचे कामही सध्या सुरु आहे. तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाळू सांडलेली असल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून समजले. वाळु तस्करांवर कुठलेही नियंत्रण नसल्याने त्याचा मन:स्ताप प्रवाशांना होत आहे.
दरम्यान, अपघातात जखमी असलेल्यांची नावे किरण संजय मुठे, उद्धव आण्णासाहेब मुठे व तानाजी दिघे असल्याचे समजते. अपघात घडल्यानंतर जखमींना सर्वप्रथम श्रीरामपूर येथे आणि त्यानंतर लोणी येथे उपचारासाठी पाठवण्यात आले.
Web Title: Accident Car overturns, bike crashes on flyover kill one
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App