छगन भुजबळ यांनी घेतला जितेंद्र आव्हाडांचा संगमनेरात खरपूस समाचार
Maratha Reservation: मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, पण ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका.
संगमनेर: जितेंद्र आव्हाड हे ओबीसी समाजाचे असूनही आजपर्यंत ते ओबीसी आरक्षण वाचावे म्हणून एक शब्दही बोलले नाही. किमान सर्व ओबीसी नेत्यांनी एकत्र येऊन मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, पण ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका. पण याबाबत एक शब्द बोलण्याची त्यांची हिंमत नसताना ते माझ्यावर टीका करत असल्याचा घणाघात अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी आव्हाड यांच्यावर केला. संगमनेर येथे दि. ३ रोजी सायंकाळी एका कार्यक्रमासाठी मंत्री भुजबळ आले होते. ते कार्यकर्ते अंकुश ताजणे यांच्या घरी चहापानासाठी गेले असता तेथे त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत संवाद साधला.
यावेळी शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) अधिवेशनावरून विचारलेल्या प्रश्नांवरून जोरदार निशाणा साधला. जे सध्या पवार साहेबांसोबत आहेत. त्यांना महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले समजलेलेच नाही. त्यांच्याबद्दल काय बोलावं. खरच या लोकांमुळे पवार साहेबांचं चांगलच भलं होईल, अशी मिश्कील टिपण्णी देखील केली. याचबरोबर पुन्हा आव्हाड यांच्यावरून विचारलेल्या प्रश्नाला जोरदार उत्तर देताना ते म्हणाले, त्यांना राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री करताना त्यांच्या पत्नींनी माझ्याकडे हात जोडून मंत्रिमंडळात घेण्याची विनंती केली. त्यावर मी स्वतः पवार साहेबांना भेटून त्यांना मंत्री करण्याची मागणी केली. ओबीसी समाजाला बरोबर घेऊन आपल्याला जावं लागेल असे सांगून त्यांचा समावेश केला, आता तेच माझ्याबर टीका करताहेत असे म्हणून एवढे विसरू नये, असा टोलाही ना. भुजबळ यांनी लगावला. यावेळी ओबीसी समाजाचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Web Title: Chhagan Bhujbal took Jitendra Awhad’s harsh news in Sangamner
See also: Breaking News live, Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, Crime News