संगमनेरात संचारबंदीतही नागरिकांचा संचार, प्रशासन हतबल
संगमनेर: वाढत्या कोरोनामुळे सरकारने राज्यात १५ दिवसांचे लॉकडाऊन व संचारबंदी लागू केली आहे. मात्र आवश्यक व अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली अनेक आस्थापनाना सूट देण्यात आली आहे. यामुळे आवश्यक गोष्टींच्या नावाखाली अनेक नागरिक मोठ्या प्रमाणात पर्यटन करताना दिसून येत आहे.
पोलीस प्रशासन कारवाई करत आहे. मात्र शासनाच्या आदेशानुसारच अनेक सेवा सुरु आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणा हतबल झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
या दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्यसरकारने पॅकेज जाहीर केले आहे. तसेच आवश्यक व अत्यावश्यक सेवा म्हणून अनेक आस्थापने सुरु ठेवलेली आहे. मात्र हे ठेवत असताना राज्यात १४४ कलमानुसार संचारबंदी जाहीर केली. आज शहरात गर्दी कमी असली तरी भाजीबाजार, किराणा, रुग्णालये, मेडिकल, कृषी उद्योग, पेट्रोल पंप सुरु आहेत. त्यामुळे खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर फिरताना दिसत आहे. यातील काही जण काम नसताना केवळ पर्यटन म्हणून फिरत आहेत.
संचारबंदी लागू असल्याने पोलीसही ठिकठीकाणी बंदोबस्त ठेवत आहे. मात्र नागरिक वेगवेगळे कारण सांगून घराबाहेर पडत आहे. नागरिक शासनाच्या नियमानुसारच प्रवास करत असल्याने त्यांच्यावर कलम १४४ अंतर्गत कारवाई करायची कशी असा प्रश्न पोलिसांपुढे निर्माण झाला आहे. काही गरजवंताला देखील कारवाईस सामोरे जावे लागत आहे तर काही जण काम नसतानाही कारवाईतून सुटका मिळवीत आहे. या संचारबंदीचा फज्जा उडाला आहे. या संचारबंदीत नियम पाळले जाणार नसतील तर रुग्ण संख्या आटोक्यात कशी येणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Web Title: citizens even during the curfew in Sangamner