संगमनेर नगर परिषदेतील अभियंता १७ हजाराची लाच घेताना ‘एसीबी’ च्या जाळ्यात
Sangamner News: घराच्या बांधकामासाठी सतरा हजार रुपयांची लाचखोरी (Bribe) करणारा संगमनेर नगर परिषदेतील कंत्राटी अभियंता नाशिक ‘एसीबी’च्या जाळ्यात.
संगमनेर: संगमनेर शहरातील मोगलपुरा भागात एका तांदळाच्या दुकानात विकास जोंधळे हा संबंधितांकडून सतरा हजार रुपयांची लाच घेताना पकडला गेला. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या घराच्या बांधकामासाठी सतरा हजार रुपयांची लाचखोरी करणारा संगमनेर नगर परिषदेतील कंत्राटी अभियंता बुधवारी नाशिक ‘एसीबी’च्या पथकाने रंगेहात पकडला. विकास सुरेश जोंधळे (वय 28 वर्ष, रा. कोकणगाव, ता. संगमनेर) असे गरिबांसाठी असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामासाठी लाचखोरी करणाऱ्या अभियंत्याचे नाव आहे.
कोणत्याही शासकीय कामासाठी लाचखोरीचे ग्रहण लागलेल्या संगमनेरमध्ये पंधरा दिवसांपूर्वी तलाठ्यासह एक खासगी इसम छत्तीस हजार रुपयांची लाचखोरी करताना ‘एसीबी’ च्या ट्रॅपमध्ये अडकला होता. त्यापाठोपाठ बुधवारी दुसरी घटना समोर आली आहे. किरकोळ कामासाठीदेखील नागरिकांना अधिकाऱ्यांना पैसे मोजावे लागत आहे. शहर पोलीस ठाण्यात बुधवारी मध्यरात्री दोन वाजता या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत गरिबांना घरे बांधण्यासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते. मात्र या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची घरे मंजूर करण्यासाठी ही पैसे घेतले जात असल्याचे समोर आले आहे. पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या अधिपत्याखाली असलेल्या या योजनेचा संगमनेर नगर परिषदेतील विकास सुरेश जोंधळे हा संगमनेर नगर परिषदेत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सी.एल.टी.सी. (टेक्निकल सेल) अभियंता म्हणून काम पाहत आहे.
त्याने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यास रक्कम खात्यावर जमा केल्याच्या मोबदल्यात व उर्वरित रक्कम शिफारस कडून लवकर काढून देण्याच्या मोबदल्यात चाळीस हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती लाभार्थ्याकडून वीस हजार रुपये घेण्याचे निश्चित झाले होते. त्यातील पहिला हप्ता म्हणून सतरा हजार रुपयांची लाच घेताना तो नासिक ‘एसीबी’च्या जाळ्यात बुधवारी सायंकाळी अडकला आहे.
एसीबीच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, हवालदार पंकज पळशीकर, पोलीस नाईक प्रकाश महाजन, नितीन कराड, वाहन चालक परशुराम जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली पकडल्या गेलेल्या जोंधळ्याची शासकीय विश्रामगृहामध्ये कसून चौकशी करण्यात आली.
Web Title: Engineer of Sangamner Municipal Council caught in the net of ‘ACB’ taking bribe
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App