चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीला संपवलं
Breaking News | Nagpur Crime: चारित्र्यावर संशय असल्याने पतीने पत्नीची गळा दाबून हत्या (Kills) केल्याची घटना.
नागपूर : चारित्र्यावर संशय असल्याने पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची घटना नागपूर जिल्हातील भिवापूर तालुक्यात उघडकीस आली आहे. पती आणि पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली. तर पैशांसाठी आपल्या मुलीची हत्या केल्याचा आरोप मुलीचे वडील नामदेव ठाटकर यांनी केला आहे. दुर्गा प्रमोद वावरे (वय ३२) असे मृत महिलेचे नाव आहे. तर प्रमोद कुसन वावरे (वय ४०) असे आरोपी पतीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दुर्गाचा पती प्रमोद तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. या कारणावरून त्यांच्यामध्ये अनेकदा भांडणेही होत होती. प्रमोद तिला नेहमी मारहाण करायचा. या त्रासाला कंटाळून ती अनेकदा घर सोडून वडिलांकडे जात होती. ४ मार्च रोजी त्यांच्यात वाद होऊन प्रमोदने दुर्गाला तिच्या वडिलांकडे वडील नामदेव ठाटकर यांच्या घरी भंडारा येथे त्यांच्या घरी नेऊन सोडले होते. तेव्हापासून ती वडिलांच्या घरी होती. त्यानंतर मंगळवारी १३ मार्चला दुर्गा आपल्या सासरी भिवापूरला परत आली. मात्र, पती प्रमोद आणि तिच्या सासू सासऱ्यांनी दुर्गाला घरी परत घेण्यास नकार देत तिला मारहाण केली.
दुसऱ्या दिवशी १४ मार्च रोजी सकाळी दुर्गाचा मृतदेह घरात पलंगावर पडलेला आढळून आला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करत असताना पोलिसांना तिच्या गळ्यावर आणि मानेवर काही खुणा आढळून आल्या, त्यावरून दुर्गाची गळा आवळून हत्या करण्यात आल्याच्या संशयावरून पोलिसांनी तिचा पती प्रमोद कुसन वावरे याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्चेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद चौधरी करत आहेत.
Web Title: husband kills his wife due to suspicion of character
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study