आयशर टेम्पोने ऊस बैलगाडीस धडक दिल्याने दोन बैलांचा जागीच मृत्यू
कोपरगाव | Kopargaon: कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी सहकारी साखर कारखाना उस तोडीस आलेल्या चाळीसगाव येथील रहिवासी यांच्या बैलगाडीस आज पहाटे ४:३० वाजेच्या सुमारास मागून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर टेम्पोने उस तोडणी बैलगाडीस जोरदार धडक दिल्याने दोन्ही बैल जागीच ठार झाले तर ऊस तोडणी कामगार विष्णू मदन राठोड वय ४० हे गाडीचालक गंभीर जखमी झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी राजाराम राठोड व त्यांचे सहकारी हे ऊस तोडणी करण्यासाठी कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या ऊस तोडणीसाठी मुकादम कैलास राठोड यांच्या टोळीमार्फत आलेले आहेत. त्यांचा अड्डा कोकमठाण येथील तीन चारी शेती महामंडळाच्या शेत जमिनीत आहेत. ते आपल्या सहकारी कामगारांसोबत असलेल्या सात गाड्यांच्या सोबत सर्वात शेवटी विष्णू राठोड यांची बैलगाडी जेऊर कुंभारी येथील हद्दीत ऊस तोडणीसाठी जात होती. बैलगाडी जात असताना मागील बाजूने भरधाव वेगाने येत असलेल्या आयशर टेम्पोवरील(क्र. एम.एच.१२ एच.डी.२४२२) चालकाने जोराची धडक दिली. त्यात त्यांची गाडी ही रस्त्याच्या खाली जोराने जाऊन पडली. या अपघातात विष्णू राठोड यांचे दोन्ही बैल जागीच ठार झाले तर गाडीवान विष्णू राठोड गंभीर जखमी झाले.
त्यांच्या सहकार्यांनी या घटनेबाबत कारखाना कार्यालयास कळविले. व त्यांनी तातडीने रुग्ण वाहिका पाठवून जखमीस सरकारी ग्रामीण रुगणालयात दाखल करण्यात आले. टेम्पो चालक मात्र त्या ठिकाणाहून फरार झाला आहे.
याप्रकरणी राजाराम राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आयशर टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
Web Title: Kopargaon bullocks die on the spot after Eicher Tempo hits a sugarcane bullock cart