राजूर : अकोले तालुक्यातील आदिवासी भागात या वर्षी उशिरा पावसाला सुरुवात झाल्याने काही भागातच भात आवणीला (लागवड) सुरुवात झाली आहे.
अकोले तालुक्यातील सुमारे आठ हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात येत असून आदिवासी भागात जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने सुरवात केली असली तरी भात लावण्याइतका समाधानकारक पाऊस पडला आहे. राजूरमध्ये खत व बियाणांची आठ दुकाने असून जवळपास मोठ्या प्रमाणात खत विक्री झाली आहे. मुळा-प्रवरा खोर्यातील काही भागातील शेतकर्यांची भात रोपे लहान असल्याने ती वाढीसाठी शेतकरी खतांचा वापर करीत आहेत. या परिसरात सर्व शेतकरी प्रामुख्याने भात हेच पीक घेतात. शेतीच्या कामाला मजूर मिळत नाहीत. मिळाले तरी मजुरी परवडत नाही.
रतनवाडी, साम्रद, घाटघर, पाचनई, कुमशेत, पांजरे, पेठ्याचीवाडी, उडदावणे, कोलटेंभे, जहागीरदारवाडी, शेणित, आदी परिसरात भात रोपांची आवणी केली जात आहे. आजच्या आधुनिक युगात ट्रॅक्टर शिवाय बैल जोडीच्या सहाय्याने चिखल (गाळ) करून भात लावणीची पद्धत या भागात अजूनही आहे. तीन ते चार आठवडेभर भात आवणीची कामे चालतात. बाहेर गावी नोकरी, व्यवसाय करणारे शेतकरीही सुट्टी काढून इर्जिक पद्धतीने एकमेकांच्या शेतीच्या कामासाठी मदतीला जाण्याची सावडी-वावडी पद्धत अजूनही ग्रामीण भागात टिकून आहे. भात रोपे लावणीकरिता सुरुवातीला चारही बाजूला बांध करून शेतात चिखल केला जातो. त्यानंतर भाताची रोपे ओळीने लावून घेतली जातात. डोंगरी भागात डोंगर उतारावर नाचणीचे (नागली) पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
Website Title: Latest News Akole: Time Spent In Akole Taluka