संगमनेर तालुक्यातील किराणा सुपर शॉपी दुकान लुटले, लाखोंचा माल लंपास
घारगाव | Sangamner: संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथे नाशिक पुणे महामार्गालगत असलेले किराणा सुपर शॉपी चोरट्यांनी फोडून ४५ हजार ७२० रुपयांची रोकड आणि इतर किराणा मालासह असा एकूण १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथे नाशिक पुणे महामार्गालगत किरण राजेंद्र भोर यांचे माय मार्ट सुपर शॉपी नावाचे किराणा दुकान आहे. त्यांनी बुधवारी नेहमीप्रमाणे उशिरा दुकान बंद केले. आणि ते आपल्या घरी निघून गेले. त्यानंतर बुधवारी रात्री ८ ते गुरुवारी सकाळी ८ वाजेदरम्यान चोरीची घटना घडली. चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूचा पत्रा उचकटून दुकानात प्रवेश करून गल्ल्यातील ४५ हजार ७२० रुपये रोख रक्कम यांसह किराणा माल संगणक, टी. व्ही. आदी वस्तू चोरून नेल्या. गुरुवारी नेहमीप्रमाणे भोर हे दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने ही माहिती घारगाव पोलिसांना दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Looted grocery super shop in Sangamner taluka