संगमनेर: माजी जि. प. सदस्य यांना मारहाण, दोन महिलांसह चौघांवर गुन्हा
Sangamner Crime: जमिनीच्या मागील वादावरुन दोन महिलांसह चौघांनी रस्त्यात गाठून बेदम मारहाण केली.
संगमनेर: काँग्रेस पक्षाचे नेते व माजी जि. प. सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते आणि घुलेवाडी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सिताराम पुंजा राऊत यांना जमिनीच्या मागील वादावरुन दोन महिलांसह चौघांनी रस्त्यात गाठून बेदम मारहाण केली. तसेच गळ्यातील सोन्याची चैन तोडून घेतली. तसेच दगडाने मारहाण करत जखमी केले. या मारहाणीचा व्हिडीओ बनवून सोशल मिडीयावर टाकून सिताराम राऊत यांची बदनामी करण्यात आली. ही घटना सकाळी 11.30 वा घुलेवाडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर घडली. या प्रकरणी दोन महिलांसह चौघांवर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत माहिती अशी की, जि.प. सदस्य सिताराम राऊत व कविता संतोष अभंग यांचे जमीनीतील राहत्या रस्त्याच्या जागेवरुन जुन वाद आहेत. दरम्यान आज सकाळी सिताराम राऊत हे ग्रामपंचायत कार्यालयासमोर आले असता त्यांच्या गाडीला आडवी लावून राऊत यांना आरोपींनी गाडीतून ओढून बाहेर काढले. आरोपी कविता संतोष अभंग, विद्या संतोष अभंग यांनी यावेळी त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरु केली. तसेच विद्या अभंग हिने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन तोडून घेत त्यांना दगड मारुन जखमी केले. तसेच त्यांच्या गाडीवर दगड मारुन गाडीचे नुकसान केले. तसेच आरोपी प्रथमेश संतोष अभंग (सर्व रा. घुलेवाडी) तर भारत संभाजी भोसले (रा. कोंची) या दोघांनी या मारहाणीचा व्हिडीओ शुटींग करत या महिलांना मारहाण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. तसेच आरोपी भारत भोसले याने या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल करतत समाजात राऊत यांची बदनामी केली. या घटनेने संपूर्ण घुलेवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी सीताराम राउत यांच्या फिर्यादीवरून वरील चारही आरोपींवर शहर पोलीस ठाण्यात कलम ३२७,३३७,३४१,३२३,५००,५०४, ५०६,३४ याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या घटनेचा घुलेवाडी ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केला आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी निषेधार्थ मंगळवारी दिनांक २० रोजी घुलेवाडी गाव बंद ठेवण्यात येणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
Web Title: Members beaten up, crime against four including two women