ठाकरे यांचा दौपदी मुर्मूना पाठिंबा, दौपदी मुर्मूना दिलेला पाठिंबा ठरणार महाविकास आघाडी तुटण्याचे कारण?
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी निर्णय जाहीर केल्यानंतर कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी एक निवेदन जारी करून नाराजी व्यक्त केली.
मुंबई: राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलैला निवडणूक होणार असल्याने या निवडणुकीत शिवसेनेचे खासदार कोणाला मतदान करणार हा मोठा प्रश्न होता. मात्र या प्रश्नाचे उत्तर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिले आहे. एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला. याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केली. एका आदिवासी महिलेला राष्ट्रपतीपदाची संधी मिळत आहे तर आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे अशी भावना खासदारांनी व्यक्त केली होती. त्याचा सन्मान करत शिवसेनेने राष्ट्रपती पदासाठी श्रीपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे’, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
मात्र, ठाकरेंच्या या निर्णयाने कॉंग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. अशा परिस्थितीत महाविकास तुटण्यासाठी हा निर्णय कारणीभूत ठरणार का अशीही चर्चा आहे.
उद्धव ठाकरे यांनी निर्णय जाहीर केल्यानंतर कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी एक निवेदन जारी करून नाराजी व्यक्त केली आहे.
निवेदनात लिहिण्यात आले आहे की, शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा का दिला? माहिती नाही. त्यासाठी त्यांनी काही कारणही सांगितले, मात्र त्या पाठीमागील त्यांची खरी भूमिका काय ते शिवसेनेचे नेतृत्वच सांगू शकेल. शिवसेना हा एक वेगळा राजकीय पक्ष आहे. त्यामुळे ते त्यांची भूमिका घेऊ शकतात. मात्र या वैचारिक लढाईत जेव्हा गैर लोकशाही मार्गाचा अवलंब करून राज्यातील सरकार पाडले गेले, शिवसेनेच्या अस्तित्वाल आव्हान दिले गेले, अशा परिस्थितीत शिवसेनेने घेतलेली भूमिका अनाकलनीय आहे. शिवसेना महाविकास आघाडीत आहे, पण हा निर्णय घेताना त्यांनी आमच्याशी काहीही चर्चा केलेली नाही, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, शिवसेनेच्या खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंवर दबाव आणल्याचे वृत्त समोर आले होते. यावर उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट उत्तर दिलं. “माझ्यावर खासदारांनी कोणताही दबाव आणलेला नाही. द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजाचं प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे आमच्या पक्षातील आदिवासी समाजाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या नेत्यांनी एका आदिवासी उमेदवाराला देशाचं राष्ट्रपतीपद भूषवण्याची संधी मिळत असल्यामुळे आपण पाठिंबा द्यायला हवा अशी विनंती माझ्याकडे केली.
Web Title: Uddhav Thackeray’s double-edged sword support