Home संगमनेर संगमनेर: पत्नीचा खून करणाऱ्या पतीस १० वर्ष सक्तमजुरी

संगमनेर: पत्नीचा खून करणाऱ्या पतीस १० वर्ष सक्तमजुरी

Sangamner: घरी घेऊन जाताना रस्त्यातच तिचा खून (Murder) करून आणि नंतर अपघाताचा बनाव रचणार्‍या पतीला दहा वर्षांचा सश्रम कारावास आणि 20 हजार रुपयांचा दंड.

10 years hard labor for husband who Murder his wife

संगमनेर:  आपल्या पत्नीसह सासरवाडीत पोहोचलेल्या व यथेच्छ मद्यपानानंतर पत्नीच्या इच्छेविरुद्ध तिला पुन्हा घरी घेऊन जाताना रस्त्यातच तिचा खून करून आणि नंतर अपघाताचा बनाव रचणार्‍या पतीला दहा वर्षांचा सश्रम कारावास आणि 20 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा संगमनेरचे अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय. एच. आमेटा यांनी सुनावली आहे.

याबाबतची हकिकत अशी की, त्र्यंबक रामदास गोंदके (रा. त्रिंगलवाडी, ता. इगतपुरी) यांची बहिण शोभा हिचे अकोले तालुक्यातील मुरशेत येथील संजय भरत बांगर याच्यासोबत लग्न झाले होते. गेल्यावर्षी 17 जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ते दोघेही मोटार सायकलवरून त्रिंगलवाडी येथे गेले होते. यावेळी संजय बांगर याचा मेव्हणा फिर्यादी त्र्यंबक गोंदके याने त्यांना यथेच्छ दारू पाजल्यानंतर त्या सगळ्यांनी सायंकाळी एकत्रित जेवण आटोपले.

त्यानंतर संजय बांगर आपल्या दुचाकीवरून मुरशेतला परतण्याचा आग्रह करू लागला. मात्र त्याने मद्याचे अधिक सेवन केलेले असल्याने त्याच्या मेव्हण्याने त्यांना त्रिंगलवाडीतच मुक्काम करण्याचा आग्रह केला. त्याच्या बहिणीचीही माहेरी रात्रभर थांबण्याची इच्छा होती व तिने ती बोलूनही दाखवली, त्याचा राग आल्याने बांगरने तिच्या भावासमोरच तिच्या श्रीमुखात मारली होती. त्यामुळे नंतर त्यांना कोणीही थांबण्याचा आग्रह न करता केवळ सावकाशपणे घरी जाण्याचा सल्ला देत निरोप दिला. त्याप्रमाणे रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान दोघे पती-पत्नी त्रिंगलवाडीहून मुरशेतकडे जाण्यास निघाले.

दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांना मुरशेतहून फोन आला व शोभा चक्कर येऊन गाडीवरून पडली व मयत झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार मयत शोभा बांगरच्या माहेरील मंडळींनी मुरशेतला धाव घेत मयताचे शरीर पाहिले असता तिच्या शरीरावर मारहाणीचे वळ दिसून आले. त्यातून घातपाताचा संशय निर्माण झाल्याने मयतेचा भाऊ त्र्यंबक गोंदके याने राजूर पोलीस ठाण्यात खून केल्याची फिर्याद दाखल केली. पोलिसांनीही खुनाचा गुन्हा दाखल केला व राजूरचे तत्कालीन सहाय्यक निरीक्षक नरेंद्र साबळे व उपनिरीक्षक खैरनार यांनी तपास पूर्ण करून आरोपी विरोधात संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.

सदर खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय.एच. आमेटा यांच्यासमोर चालला. सदर खटल्यात सरकारी अभियोक्ता बी. जी. कोल्हे यांनी सरकारी पक्षाच्यावतीने एकूण नऊ साक्षीदार तपासले. साक्षीदारांनी न्यायालयासमोर नोंदविलेले जबाब व वैद्यकीय अधिकार्‍यांची साक्ष ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी संजय भरत बांगर याला दोषी धरून 10 वर्षांच्या सश्रम कारावासासह 20 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने अतिरीक्त कारावासाची शिक्षा सुनावली. सदर खटल्याचे कामकाज सरकारी वकिल भानुदास कोल्हे यांनी पाहिले. त्यांना अ‍ॅड. गवते, अ‍ॅड. दिवटे यांनी साहाय्य केले. पो. कॉ. स्वाती नाईकवाडी यांनी पैरवी अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.

Web Title: 10 years hard labor for husband who Murder his wife

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here