चेअरमन राजू राहाणे यांचे पिताश्री यांचा सपत्नीक अभिष्टचिंतन सोहळा संस्मरणीय
संगमनेर (प्रतिनिधी):- परमपूज्य संभाजी बबुराव राहाणे, सौ.गिरजाबाई राहाणे व सौ. ठकुबाई राहाणे यांचा अभिष्टचिंतन सोहळा चंदनापुरी येथील श्री स्वामी समर्थनगर मध्ये नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेचे आ.डॉ.सुधीर तांबे हे होते. याप्रसंगी स.म.भा. थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात,जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती गणपत सांगळे, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मीराताई शेटे, पंचायत समितीच्या सभापती सुनंदा जोर्वेकर,आर.बी.राहाणे, शिक्षक नेते जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे,शिक्षक बँकेचे संचालक शरद सुद्रिक, संतोष दुसुंगे, सलीम खान पठाण,गोकुळ कळमकर,बाळासाहेब मुखेकर, गंगाराम गोडे, साहेबराव अनाप,बाळासाहेब सरोदे, मंगेश खिलारी आदींसह मान्यवर उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. जिल्हाभरातून शिक्षक बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक:
आमचे पिताश्री तीर्थरूप संभाजी बबुराव पा.राहाणे यांचा जन्म 1 जानेवारी 1941 रोजी झाला.2021 मध्ये त्यांचे 81 व्या वर्षात पदार्पण होत आहे याचा आम्हा कुटुंबीयांना विशेष आनंद वाटतो.
जन्मानंतर अवघ्या 10 महिन्यांत त्यांचे मातृछत्र हरपले.कै.भागीरथीबाई बबुराव राहाणे या चार भावंडांना सोडून इहलोकीचा प्रवास संपवून परलोकी निघून गेल्या. पिताश्रींना तीन मोठ्या बहिणी. १ .गंगुबाई मार्तंड नेहे २.शेवंताबाई सिताराम नेहे ३. भिमाबाई भागवत कोल्हे. त्यापैकी शेवंताबाई फक्त हयात आहेत.. लहानपणीच आई गेल्याने त्यांचे पालन पोषण एकत्रित कुटुंबात सुरू होते. आमच्या चंदनापुरी चे भूषण क्रिकेट वीर अजिंक्य रहाणे यांच्या आजी झेलूबाई बाबुराव राहणे आणि आनंदा विठोबा राहणे यांच्या मातोश्री सोन्याबाई यांनी पिताश्रींना अक्षरशः अंगावर पाजून सांभाळले. अजिंक्य चे चुलते सिताराम बाबूराव राहणे आणि आनंदराव हे त्यांचे बालपणीचे सवंगडी… 1942 च्या चळवळीतील बळवंतराव पाटील राहणे यांना क्रांतिकारकांच्या भूमिकेतून पकडून नेले तो प्रसंग पिताजींना चांगलाच आठवतो..बालपणी त्यांना आजोबा कै. रखमा हरकू राहणे , आजी ममताबाई , वडील बबुराव , चुलते बाबुराव व चुलती तान्हाबाई यांनी या चारही भावंडांचा सांभाळ केला..यामध्ये मोठी बहीण गंगुबाई यांची भूमिका खूप मोलाची राहिली आहे.
पिताश्रींचे शिक्षण जीवन शिक्षण मंदिर चंदनापुरी येथेच जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथीपर्यंत झाले. त्यावेळी चौथीपर्यंत शिकले की नोकरी मिळायची. पण त्यांनी ती नाकारली. त्यांच्या लहानपणी घरी गुळ निर्मिती चे गुऱ्हाळ होते. मोटेच्या पाण्यावर शेती चालायची .. दूध-दुभते भरपूर असायचे. कष्टाची आवड असल्याने शेतीतच राबवून त्यावरच कुटुंबाचा गाडा पुढे चालत असे..
साधारण पंधरा वर्षाचे वय असेल तेव्हा कुटुंबाची विभागणी झाली आणि पिताश्री यांची जबाबदारी वाढली. त्यातच त्यांची आजी म्हणजे ममताबाई हिला अंधत्व प्राप्त झाले. त्या वेळी वडिलांची मावळण सरूबाई हिने कुटुंबाची जबाबदारी निकराने सांभाळली. सरूबाईंचे सासर खराडी च्या साबळे पाटलांचे…पण त्यांचे सासरचे कुटुंबाशी रुचलेच नाही .. त्यांनी माहेरात राहून आमच्या कुटुंबाला दिलासा दिला. अगदी आमच्या सहा भावंडांपैकी चार भावंड म्हणजे सरूबाई नातवंड त्यांनीच सांभाळली ..
साधारण 20 वर्षाच्या वयात रामकृष्ण यशवंता वाळे राहणार झोळे यांची मोठी मुलगी गिरजाबाई यांच्याशी पिताश्री यांचा विवाह झाला..पुढील दहा वर्ष अशीच गेली. मूलबाळ झाले नाही. त्यानंतर गिरजा बाईंची पाठची बहीण ठकुबाई यांच्याशी दुसरा विवाह झाला. लग्नानंतर 1972 चा दुष्काळ पडला ..कुटुंबाची परिस्थिती हलाखीची झाली…फॉरेस्ट आणि नालाबंडिंग चे काम करून कुटुंबाची गुजराण व्हायची..मोलमजुरी करून खूप गरिबीचे दिवस काढले. 1974 ते 75 साली सावरगाव तळ च्या शिवारात विहीर खणली .. मग गावातून वस्तीवर राहायला गेले 1975 साली पस्तीस वर्षाच्या वयामध्ये ठकुबाई म्हणजे धाकट्या मातोश्री यांना पहिलं मूल झालं . ते राजेंद्र संभाजी राहणे सर… आपणा सर्वांना सुपरिचित आहेत.. त्यानंतर सात आठ महिन्यांनी थोरल्या मातोश्रींना देखील कन्यारत्न प्राप्त झाले . आमची थोरली बहीण प्रमिला बाळासाहेब शिंदे हे त्यांचे मोठे अपत्य. .. पुढे मोठ्या मातोश्रींचे तीन अपत्य १ प्रमिला २ मंगल आणि ३ सोमनाथ…. सोमनाथ हा आमच्यातील सर्वात धाकटा ..तो आज संगणक अभियंता म्हणून पुणे व मुंबई येथे काम करतो आहे… प्रमिला व मंगल दोघेही गृहिणी असून आपल्या सासरी सुखाने शेती करत आहेत …धाकट्या मातोश्री ठकुबाई यांना राजेंद्र ,ज्ञानदेव आणि दिनेश अशी तीन अपत्ये… राजेंद्र हे प्राथमिक शिक्षक असून प्राथमिक शिक्षकांचे प्रतिनिधी या नात्याने अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या चेअरमन पदी जिल्ह्यात काम करत आहेत .. त्यांचा मुलगा चेतन हा देखील पुणे येथे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीत संगणक अभियंता म्हणून रुजू झाला आहे… ज्ञानदेव व दिनेश हे उत्तम प्रकारची आधुनिक शेती करत आहेत…ज्ञानदेव यांची पत्नी अलका ही चंदनापुरी गावातच शिवकृपा लेडीज वेअर व साडी सेंटर हे कापड दुकान चालवते… आज आमचे 19 माणसांचे एकत्रित कुटुंब असून यशस्वीरित्या संसाराचा गाडा सुरू असल्याचे पाहायला मिळते .. सन 1978 साली पिताश्री यांचे वडील कै. बबुराव रखमा राहणे हे दिवंगत झाले. गरिबीची परिस्थिती असतानाही पिताश्रींनी मातोश्री ठकुबाई व गिरजाबाई यांच्या भक्कम साथीने कष्ट करत करत सहाही मुलांचे शिक्षण पूर्ण केले … याकरिता अनेक वर्ष नालाबंडिंग चे काम असेल तसेच साखर कारखान्यावर ऊस तोडणी काम असेल अशी अनेक कष्टाची कामे माता-पित्यांनी आनंदाने केली.. मातोश्री ठकुबाई यांनी अनेक वर्ष मालपाणी कारखान्यात तंबाखूचे काम केले..त्यातूनच मुलांच्या वह्या पुस्तकांची गरज ‘तंबाखू कामगार’ या नात्याने भागवली जायची…
मातोश्री ठकुबाई या देखील चौथी पर्यंत शिकलेल्या असल्याने शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्यांनी पिताजींना मुलांच्या शिक्षणासाठी मोलाची साथ दिली…घरचे सगळे नियोजन मातोश्री स्वतः सांभाळत असत.. आजही सांभाळतात …
पुढे मोठा मुलगा नोकरीला लागल्यावर परिस्थिती बदलली…शेतीमध्ये सुधारणा झाली… प्रवरा नदीवरून 24 हजार फूट पाईपलाईन आणली . शेती सपाटीकरण करून शेतात पाईपलाईन फिरवली..आधुनिक तंत्रज्ञान वापरत शेती व्यवसायात स्थिरता प्राप्त झाली. आज रोजी दोन मुले दोन सुना नोकरी करतात आणि दोन मुले व दोन सुना शेती सांभाळतात..नातवंडांचे शिक्षण सुरू आहे. एका जागेवर 10 एकर शेती 3 विहिरी, बोअर , चार ठिकाणी चार बंगले, ट्रॅक्टर , चार चाकी गाड्या हे सगळं वैभव माता-पित्यांच्या कष्टातून उभे राहिलेले पहायला मिळते..
आमच्या बालपणापासून आतापर्यंत आमच्याकडे सतत गाईंचा गोठा भरलेला आहे..आजही मुक्तसंचार गोठ्यात पंधरा-वीस गाई आहेत.. 100 लिटर दूध उत्पादन दररोज सुरू आहे . घरची साडेतीन एकर शेती होती ती कष्टाने दहा एकर पर्यंत वाढवली. पिताश्री गावात सोसायटीमध्ये संचालक पदावर देखील काम करत होते. आज मातोश्री आणि पिताश्री यांचे जीवन अतिशय सुखमय आणि आनंदमय अशा रीतीने ते घालवत आहेत…
अशा प्रसंगी आमच्या माता-पित्यांचा गौरव तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत आणि राज्याच्या प्रतिनिधींच्या शुभहस्ते संपन्न होत आहे याचा आम्हाला निश्चितपणे अत्यानंद होत आहे
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन राजू राहाणे यांनी केले. परमपूज्य पिताश्री संभाजी राहाणे यांचा जीवन परिचय त्यांनी उलगडून सांगितला. याप्रसंगी तीनही सत्कारमूर्तींचा एकत्रित वाढदिवस केक कापून कुटुंबीयांसमवेत मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येऊन अभिष्टचिंतन संपन्न करण्यात आले. डॉ. तांबे यांनी राहाणे परिवाराचे आधारवड परमपूज्य संभाजी राहाणे यांना शतायुषी आरोग्यदायी जीवन लाभावं व शतक महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळाही असाच थाटामाटात होवो अशा शब्दात शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी शिक्षक नेते बापूसाहेब तांबे, माजी सभापती गणपत सांगळे,सभापती मीरा शेटे, सुनंदा जोर्वेकर,सलीमखान पठाण, गोकुळ कळमकर या मान्यवरांनी सत्कारमुर्तीना आरोग्यदायी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमानंतर महाराष्ट्रीयन पद्धतीच्या सुरुची भोजनाचा उपस्थितांनी आस्वाद घेतला.
कार्यक्रमादरम्यान एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन यावेळी करण्यात आलं होतं. अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून या शिबिराला प्रतिसाद दिला. शिबिरासाठी अर्पण ब्लड बँकेच्या संचालिका प्रमिला कडलग यांनी विशेष परिश्रम घेतले.अभिष्टचिंतन प्रसंगी झालेला सन्मान पाहून परमपूज्य पिताश्री व मातोश्री हरखून गेले होते.उत्कृष्ट नियोजनामुळे संस्मरणीय असा अभिष्टचिंतन सोहळा सर्व उपस्थितांनी “याची देही,याची डोळा” अनुभवला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अन्नपूर्णा ग्रुप चंदनापुरीच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकिशोर राहाणे यांनी तर आभार प्रदर्शन केशव घुगे यांनी केलं.
Web Title: Abhishtachintan ceremony of Raju Rahane father