Accident: संगमनेर तालुक्यात अपघात, एक ठार
Sangamner Accident: संगमनेर तालुक्याच्या पठार भागात आंबी खालसा फाटा येथे अपघात झाल्याने एक जण ठार झाल्याची घटना.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पठार भागात दसऱ्याच्या पूर्वसंध्येला दुर्दैवी घटना घडली आहे. तालुक्याच्या पठार भागातील आंबीखालसा फाट्यानजीक आंबी रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार झाल्याची घटना मंगळवार दिनांक ४ ऑक्टोंबर रोजी रात्री साडेसात वाजेच्या दरम्यान घडली आहे.
याबाबत घारगांव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रवींद्र यशवंत भोर हे मंगळवारी रात्री घारगांव येथून आपल्या राहत्या घरी आंबीखालसा येथे पायी जात होते. रात्री साडेसात वाजेच्या दरम्यान ते आंबीफाटा जवळच आंबी रोडवरून जात असताना त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. व वाहनचालक फरार झाला. ही गोष्ट रस्त्याने जाणाऱ्यां येणार्यांच्या लक्षात येताच तेथे मोठी गर्दी जमा झाली. घारगांव पोलिसांनाही माहीती मिळताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. यात रवींद्र यशवंत भोर(वय – ५२) हे जागीच ठार झाले. मयत भोर यांस खाजगी रुग्णवाहिकेतून उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आले.शांताराम कोंडाजी भोर यांच्या खबरीवरुन घारगांव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.तर या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र लांघे करत आहेत.
दरम्यान भोर यांच्या आकस्मिक निधनाने आंबीखालसा गावांसह माळेगांव पठार, घारगांव गावातून हळहळ व्यक्त होत आहे.
Web Title: Accident in Sangamner taluka, one killed