शिवशाही बसने दुचाकीस जोराची धडक दिल्याने अपघातात दोन ठार
पारनेर | Accident: नगर पुणे महामार्गावर चास शिवारात शिवशाही बसने दुचाकीस जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात पारनेर तालुक्यातील दोघे जण जागीच ठार झाल्याची घटना घडली. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडला. अपघात इतका भीषणहोता की दोघांचेही मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पडल्याचे दिसून आले.
याबाबत माहिती अशी की, राळेगणसिध्दी येथील आदर्श पतसंस्थेचे व्यवस्थापक संजय क्षीरसागर तसेच माजी सरपंच रोहिणी गाजरे यांचेे पती दादाभाऊ गाजरे हे शुक्रवारी कामानिमित्त नगर येथे गेले होते.
नगर येथील कामे आटोपून दोघेही पुन्हा राळेगणसिध्दीकडे निघाले होते. वाटेत चास शिवारातील हॉटेलमध्ये ते जेवणासाठी थांबले होते. जेवण आटोपल्यानंतर ते पुन्हा राळेगणसिध्दीकडे परतण्याच्या तयारीत होते. नगरकडे जाणारा रस्ता ओलांडीत असताना नगरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या शिवशाही बसने त्यांच्या दुचाकीस जोराची धडक दिली. त्यात दोघेही दुचाकीसह फरफटत गेले. त्यात त्यांच्या शरीराची अक्षरशः छिन्न विछिन्न अवस्था झाली होती.
दुर्घटनेची माहीती समजल्यानंतर राळेगणसिध्दी तसेच पानोली येथील तरूणांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत रस्त्यावरील मृतदेह शवविच्छेदनासाठी नगर येथे हालविण्यात आले तसेच रस्त्यावरील वाहने दुर करण्यात येऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली. या घटनेने पानोली गावात शोककळा पसरली आहे.
Web Title: Accident Two killed as Shivshahi bus hits two-wheeler